नदीम शेख,पालघर
पालघर स्थानकावर कच्छ व दादर-बीकानेर एक्सप्रेसला थांबा,
पालघर जिल्ह्याच्या रेल्वेप्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, २२९५५/२२९५६ बांद्रा टर्मिनस-भुज कच्छ एक्सप्रेस आणि १२४८९/१२४९० बीकानेर-दादर एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांना प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.त्यानंतर प्रशासन तिकीट विक्री आणि प्रवाशांच्या प्रतिसादाच्या आधारावर याचे पुनरावलोकन करणार आहे.
प्रवाशांची संख्या समाधानकारक राहिल्यास,या थांब्यांना कायमस्वरूपी मंजुरी देण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामागे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.हेमंत सवरा यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे.त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्रव्यवहार करून तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून ही मागणी सातत्याने मांडली होती.जिल्ह्याचा औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा विचार करता,तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी हे थांबे आवश्यक असल्याचे त्यांनी वेळोवेळी रेल्वे मंत्रालयाच्या नजरेस आणून दिले होते.आता पालघर रेल्वे स्थानकावर दोन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांचे थांबे प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर निश्चित करण्यात आले आहेत.
गाड्यांचे प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर थांबण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
कच्छ एक्सप्रेस – शनिवार, सायं. ७.०५ वाजता.
दादर-बीकानेर एक्सप्रेस –रविवार, दुपारी- ४.२० वाजता.
पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून,येथे वाढवण बंदर, विमानतळ प्रकल्प,तसेच तारापूर एमआयडीसी यांसारखी महत्त्वाची औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत.वाढती औद्योगिक गरज आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता,या थांब्यांची आवश्यकता वेळोवेळी स्पष्ट होत होती.
खा.डॉ.हेमंत सवरा यांनी अंमलबजावणीच्या दिरंगाईवर थेट लक्ष केंद्रित करून रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने निर्णय होईल, यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कायमस्वरूपी थांबे मंजूर केले.
या निर्णयामुळे पालघर जिल्ह्याच्या नागरिकांना, उद्योग क्षेत्राला व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम होणार आहे.

