वसंत भोईर,वाडा
वाडा शहराला मिळाले अतिरिक्त पाणी ; वाडावासीय सुखावले,
वाडा शहराला वैतरणा नदीवरील सिध्देश्वर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यात येत असतो.मात्र यंदा पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे वाडा शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.अखेर तहसीलदार गटविकास अधिकारी व लघुपाटबंधारे अधिका-यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नामुळे अतिरिक्त पाणी मिळू शकले. त्यामुळे वाडावासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
वाडा शहराची लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या आसपास असून शहराला वैतरणा नदीवरील सिध्देश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा पुरवठा केला जातो.मात्र दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात नदीच्या पाण्याची पातळी खाली जाते व नदी कोरडीठाक पडते.त्यामुळे दरवर्षी या दोन महिन्यात वाडावासींयावर तीव्र पाणीटंचाईचे सावट असते. अखेर याविषयी वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यानी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे याच्याकडे ही वस्तुस्थिती मांडली. त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने तिळसे येथील बंधाऱ्यातील एक फळी काढून पाणी सिध्देश्वर बंधाऱ्यात सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे वाडावासीयांच्या पाण्याची समस्या संपुष्टात आली आहे.तहसील व लघुपाटबंधारे प्रशासनाचे वाडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पष्टे यांनी आभार मानले आहेत.

