दीपक मोहिते,
निवृत्त न्या.संजीव खन्ना ; न्यायव्यवस्थेतील आदर्श व्यक्तिमत्व,
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदाची सूत्रे न्यायमूर्ती बी.आर.गवई यांनी नुकतीच स्विकारली.निवृत्त होत असलेले भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.
अॅटर्नी जनरल,सॉलिसिटर जनरल यांच्यापासून ते सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांपर्यंत अनेक दिग्गज, तसेच न्यायपालिकेशी संबंधित विविध मान्यवर या निरोप समारंभाला हजर होते.यावेळी अनेक वक्त्यांनी खन्ना यांचं कौतुक करत त्यांना हसतमुखाने निरोप दिला.
अॅटर्नी जनरल आर. वेकंटरमणी यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी आपल्या भाषणात आजवर दिलेल्या निकालांचे,त्यांच्या स्पष्टतेचे व त्यांच्या साधेपणाचे तोंडभरून कौतुक केले.वेंकटरमणी म्हणाले, “ सरन्यायाधीश संजीव खन्ना हे नेहमीच न्यायपालिकेचे स्वातंत्र्य व संस्थात्मक अखंडता कायम राहावी,यासाठी आपल्या कार्यकालात प्रयत्नशील होते.”
कपिल सिब्बल
ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल म्हणाले, “ कायद्याची अशी कुठलीच शाखा नाही,जेथे तुमच्या विचारांची स्पष्टता दिसली नाही.तुम्ही नेहमीच खंडपीठाच्या बाजूने असल्याचं पहायला मिळाले.तरुण वकिलांना प्रोत्साहन देणे,त्यांना व्यासपीठावर येऊन युक्तिवाद करण्यास प्रेरित करणे,हे न्यायाधीशाचे सर्वोत्तम गुण खन्ना यांच्यात आहेत.त्यांनी खरोखर न्यायव्यवस्थेचं योग्य प्रतिनिधित्व केलं आहे.”
न्यायमूर्ती कुमार यावेळी म्हणाले, “ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना संजीव खन्ना यांनी दिलेले अनेक निकाल,हे अत्यंत अभ्यास करण्याजोगे होते. आम्ही त्यांच्याकडून व्यवहारिकपणा शिकलो.
उत्तरादाखल केलेल्या भाषणात सरन्यायाधीश संजीव खन्ना म्हणाले,मी हा कार्यक्रम पाहून,कौतुक ऐकून,सगळी भाषणं ऐकून भारावून गेलो आहे.माझ्याकडे खूप आठवणी आहेत,ज्या कायम माझ्या आठवणीत राहतील.तुम्ही एकदा का वकील झालात की वकीलच राहता.न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास आहे.तो सहजासहजी मिळवता येत नाही.तो कमवावा लागतो.भारतातील न्यायपालिकेने तो कमावला आहे.बार आणि बेंचच्या ( वकील व न्यायाधीश ) प्रत्येक सदस्याला तसं काम करावं लागतं.वकील व न्यायाधीशांनी मिळून केलेल्या चांगल्या कामामुळे तो विश्वास प्राप्त करता येतो.”
संजीव खन्ना,वकिलांना उद्देशून म्हणाले, “ तुम्ही ( बार/वकील ) विवेकाचे रक्षक आहात.त्यामुळेच तुमची जबाबदारी देखील मोठी आहे.” दरम्यान,त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत म्हणजेच पुढच्या सरन्यायाधीशांबाबत संजीव खन्ना म्हणाले, बी.आर.गवई हे उत्कृष्ट न्यायाधीश आहेत.तेही संस्था, मूलभूत अधिकार व कायद्याची मूलभूत तत्वे जपतील,असा मला विश्वास आहे.”

