नवीन पाटील,सफाळे
मायखोप गावात लाखो लिटर पाणी वाया…
पालघर जिल्ह्यातील झांझरोळी धरणाची जीर्ण झालेली जलवाहिनी मायखोप गावात फुटल्याने परिसरात लाखो लिटर पाणी वाया गेले. जीर्ण झालेली जलवाहिनी बदलणे आवश्यक असताना कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे ही जलवाहिनी वारंवार फुटत आहे.त्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया जात आहे.
पालघर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला कळवुनही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा सारख्या तालुक्यात अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो तर दुसरीकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे.काल सकाळी सहाच्या सुमारास केळवे रोड बंधारा धरणाची जलवाहिनी मायखोप गावात फुटली.
केळवा, मायखोप व माकुणसार ते थेट दातिवरेपर्यंत या
झांझरोळी धरणातून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही जवळपास ४० वर्षे जुनी ३०० मिलिमीटर व्यासाची असून सध्या ती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे सतत फुटते व मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असते.
त्यामुळे या गावातील नागरिकांना किमान दोन ते तीन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे,परंतु पाणीपुरवठा विभागाकडून जलवाहिनीची व्यवस्थित देखभाल होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
मायखोप येथील रहिवासी संजय पाटील यांच्या घराजवळ काल सकाळी जलवाहिनी फुटल्यामुळे घर बांधण्यासाठी साठवून ठेवलेली रेती वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे ती रेती वाहून गेली असून पंचायत समिती व पाणीपुरवठा विभागाने नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

