नदीम शेख,पालघर
नुकसानभरपाईसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे -आ.गावित,
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेकडो घरांचे नुकसान झाले आहे.तसेच मच्छीमार बांधवांचे देखील मोठे नुकसान झाल्याने पालघर जिल्ह्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून शेतकरी,आदिवासी आणि बागायतदार तसेच मच्छीमार बांधवांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक घरांचे अतोनात नुकसान झाले होते. अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे शेतकरी,मच्छीमार,सामान्य जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे.
शेतकऱ्यांचे दुबार भात शेती सह विट उत्पादक,पालेभाजी फळबाग लागवड शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.आ.राजेंद्र गावित यांनी धाकटी डहाणू येथील दुर्घटनाग्रस्त भागाचा नुकताच दौरा केला.यावेळी ७० ते ८० छोट्या मोठ्या बोटींचे वादळी पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.तसेच मासे सुकवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या मासळीचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे.डहाणू तालुक्यातील उर्से,गंजाड,आंबिवली, रायतळी, निकवली, दाभोण आदी सह अनेक गावातील नागरिकांची घरे दुर्घटनाग्रस्त झाली आहेत.अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले असून शेतीचे नासधूस झाली आहे.
आ. Lराजेंद्र गावित यांचे समवेत धाकटी डहाणू येथे तहसीलदार सुनील कोळी,सहायक आयुक्त मत्स्य विकास दिनेश पाटील यासह गावातील सरपंच, उपसरपंच,विविध मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून शासनास सादर करावे,असे निर्देश आ.राजेंद्र गावित यांनी दिले.झालेले नुकसान शासकीय निकषात बसवून शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांना योग्य नुकसान भरपाई मिळण्याकरिता विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे आ.गावित यांनी यावेळी सांगितले.

