नवीन पाटील, सफाळे
अवकाळी पावसामुळे सफाळ्यात मोठे नुकसान,
पालघर जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.रात्री उसंत घेतल्यानंतर काल दुपारपासून पुन्हा सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित होवून नागरिकांची त्रेधा तिरापिट उडाली.

परिसरातील अनेक घराचे पत्रे उडाले तसेच उन्हाळी भात पीक,आंबा बागायती,जांभूळ, मिरचीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यांमुळे सफाळे भागातील आगरवाडी,चटाळे,, येथील घरांचे तर टेंभीखोडावे येथील शाळेच्या स्टेजवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. सफाळे,नांदाडे,गेरूचा ओहोळ आदी ठिकाणी घरावर आणि रस्त्यावर झाडे कोसळल्याच्या असंख्य घटना घडल्या.यात उंबरपाडा- सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश बंटी म्हात्रे आणि सर्पमित्र टीमने काल दिवसभर दुर्घटनग्रस्त ठिकाणी मदतकार्य केले.अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरण सफाळे विभागाकडून अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून रात्री उशिरा पर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.या अवकाळी पावसामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाकडून नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

