दीपक मोहिते,
प्रशासनाचा हलगर्जीपणा ; निधी निधी उपलब्ध होऊनही धुपप्रतिबंधक बंधारा कागदावरच…
वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर संरक्षक बंधारा बांधून समुद्रकिनारा गिळंकृत करण्यापासून वाचवावे,अशी मागणी या समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिक रहिवाश्यानी राज्य शासनाकडे केली आहे.
सागरी जीवावर अभ्यास करणारे संशोधक भुईगाव,रानगाव समुद्र किनाऱ्याला पसंती देत असतात.पर्यटनसोबत वसईतील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भात,चवळी, गवार,वाल,दुधी,विविध फुलं आदी शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.पर्यटन व शेतकरीसाठी प्रसिद्ध असलेले निसर्गरम्य समुद्रकिनारे जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
केंद्र व राज्य शासनाने निसर्ग व तोते,या वादळानंतर कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी तब्बल ४ हजार ७०० कोटी रु.मंजूर केले.त्याअंतर्गत धूपप्रतिबंधक बंधारे,पूर संरक्षक भिंत,दरड प्रतिबंधात्मक कामे,
बहुउद्देशीय निवारा केंद्र,खार प्रतिबंधक बंधारे,भूमिगत विद्युत वाहिनी इ.विकासकामे प्रस्तावित आहेत.यापैकी पाचूबंदर,रानगाव,भुईगाव व नवापूर येथे धुपसंरक्षक बंधाऱ्यसाठी तब्बल ३० कोटी रु.रक्कम मंजूर करण्यात आली आहे.तर पूर व वादळ या नैसर्गिक संकटापासून रक्षण करण्यासाठी बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यासाठीही निधी मंजूर आहे.ही कामे २०२५-२६ पर्यंत सर्व काम होणे अपेक्षित असताना संबंधित विभागाने आजवर एकही रुपया खर्च करण्यात आला नाही.
हवामान बदलामुळे मागील २-३ वर्षापासून भरतीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सोबत किनारपट्टी व पाणथळ भागात वाढत असलेली अतिक्रमण,इ. कारणामुळे समुद्राचे पाणी गावाच्या दिशेने सरकू लागले आहे.आता तर समुद्राचे पाणी या समुद्रकिनारी असलेली शेती व सुरुच्या बागेत शिरू लागले आहे.भुईगाव समुद्रकिनारी असलेल्या सुरुच्या बागेतील सुमारे ५ हजाराहून अधिक झाडे भरतीच्या पाण्यात जमीनदोस्त झाली आहेत.
गावकरी व पर्यावरण प्रेमी यांनी मागील ३-४ वर्षापासून भुईगाव व समुद्र किनारी संरक्षक बंधारा बांधण्यात यावा,यासाठी तहसीलदार,प्रांत,महानगर पालिका, जिल्हाधिकारी,मेरीटाईम बोर्ड आदी ठिकाणी सातत्याने पाठपुरावा करत आहेत.परंतु शासनस्तरावर कोणतीही हालचाल होत नाही.त्यामुळे भविष्यात किनारपट्टी भागात राहणारे हजारो गावकरी,शेतकरी व मच्छीमार यांच्या जीवावर बेतू शकते.हवामान बदलासोबत वाढवण येथे समुद्रात ५ हजार एकरमधील ३० फूट खोल होणाऱ्या मातीभरावामुळे भुईगाव,रानगाव,अर्नाळा आदी गावे संकटात सापडण्याची शक्यता आहे. शासनाने तत्काळ उपलब्ध निधीचा वापर करीत येथे मजबूत संरक्षक बंधारा बांधून वसईला समुद्र गिळंकृत करण्यापासून वाचवावे,अशी मागणी गावकरी व शेतकरी करत आहेत.वसईसाठी ३० कोटी रु.मंजूर असूनही आजपर्यंत धुपसंरक्षक बंधारा कागदावरच राहिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात हा समुद्रकिनारा धोकादायक ठरणार आहे.

