सचिन परब,वसई
कांदळवन कत्तलप्रकरणी जनमाहिती अधिकाऱ्याकडून दिशाभूल करणारा अहवाल,
वसईतील पाचुबंदर येथील कांदळवन नष्ट केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी, वसई यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात अधिकाऱ्याने सदोष अहवाल सादर केल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील जनमाहिती अधिकाऱ्याची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मालोंडे सर्वे क्रमांक ७३/६ या पाचूबंदर,वसई येथील जागेवर कांदळवनाची कत्तल करून प्रचंड मातीभराव करण्यात आला होता.या जागावर बंगले उभारण्यात आले आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या मंडळ अधिकाऱ्याने सर्वे क्रमांक जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा नमूद केल्यामुळे दिशाभूल झाली आहे. याबाबत तक्रारदाराने माहिती अधिकारात माहिती मागवली असता त्यास डावलण्यात आले.अधिकाऱ्यांच्या या कारवाईच्या विरोधात उपविभागीय अधिकारी, वसई यांच्याकडे दाद मागण्यात आली.त्यांच्याकडे देण्यात आलेल्या तक्रारीमध्ये जनमाहिती अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
जनमाहिती अधिकारी यांचे भूमाफियांशी साटेलोटे असल्याचा खळबळजनक आरोप तक्रारदाराने आपल्या तक्रार अर्जात केला आहे. त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.या प्रकरणी संबधीत जन माहिती अधिकाऱ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.
त्यामुळे कांदळवनाची कत्तल झाल्या प्रकरणात आवश्यक कारवाई होण्याऐवजी संबंधित दोषी कर्मचाऱ्याच्या चौकशीचे फेरे सुरु झाले आहेत.त्यामुळे तालुकास्तरीय कांदळवन समितीतर्फे जागेची पाहणी होऊन पुढील कार्यवाही करावी लागेल,असा अभिप्राय वसईचे तहसिलदार यांनी दिला आहे.
दरम्यान, सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये याप्रकरणावर चर्चा झाली आहे.त्यानुसार आवश्यक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

