वसंत भोईर,वाडा
पाण्यासाठी महिलांना रात्रभर लागते जागावे लागते ;. महिलांना विहीरी,नदीपात्रात पाण्यासाठी उतरावे लागते,
वाडा तालुक्यापासून अवघ्या तीन कि.मी.अंतरावर असलेल्या हरोसाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाण पाडा व उंबरोठे ग्रामपंचायत क्षेत्रातील नदीपाडा येथील विहीरींनी तळ गाठला आहे.दोन ते तीन हंडे पाण्यासाठी संपूर्ण रात्र जागरण करून येथील महिलांना पाणी भरावे लागत आहे.या गावपाड्यासाठी मंजूर असलेली जलजीवन योजनेची पाणी पुरवठा योजना अडीच वर्षापासून अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी त्राही त्राही झाली आहे.
वाडा शहरापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर हरोसाळे ही ग्रामपंचायत आहे.या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गावठाण पाडा असून या पाड्याची लोकसंख्या तीनशेच्या आसपास आहे.या पाड्यासाठी एक विहीर असून पाण्याची पातळी खोलवर गेली आहे.त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.येथे असलेली कुपनलिकाही गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त असल्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची पाळी आली आहे.विहीरीतून दोन ते तीन हंडे पाड्यासाठी संपूर्ण रात्र जागून पाणी भरावे लागत आहे.रात्रीच्या जागरणा नंतर सकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर जावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
अशीच परिस्थिती उंबरोठे गावाच्या हद्दीत असलेल्या नदी पाडा येथे आहे. या पाड्यावर सुमारे सत्तर कुटुंबे राहतात.या पाड्यासाठी एकमेव कुपनलिका असून या कुपनलिकेवर पाणी भरण्यासाठी नंबर लावावा लागतो.दोन ते तीन हंडे भरून झाल्यानंतर काही वेळ थांबावे लागते.पुन्हा कुपनलिकेत पाणी साचल्यावर दुस-याचा नंबर येतो,अशी विदारक परिस्थिती वाडा तालुक्यात पहावयास मिळत आहे.गेल्या अनेक वर्षात अनेक योजना आल्या मात्र पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरूच आहे.

