सचिन परब,वसई,
वसईत धान्याचा काळाबाजार करणाऱ्या ५ दुकानाचे परवाने रद्द,
वसईत धान्याचा काळाबाजार करणार्या ५ शिधावाटप दुकानांचे परवाने पुरवठा विभागाकडून रद्द करण्यात आले आहेत.सध्या या रास्तभाव दुकानातील कार्ड्स आसपासच्या परिसरातील दुकानाना जोडण्यात आली आहेत.जेणेकरून लोकांना या कारवाईचा त्रास होणार नाही.
या दुकानात येणारे धान्य खाजगी बाजारात विकले जात असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे सातत्याने येत होत्या.याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात रास्तभाव दुकानदारांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. शिधावाटप दुकानात धान्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.भारतीय खाद्य निगमकडून येणारे धान्य शिधावाटप केंद्रात न उतरवता ते अन्य ठिकाणी उतरवले जात होते.यामध्ये रास्तभाव दुकान चालवणारे जगदंबा महिला बचत गट,जितेंद्र चव्हाण,श्रमिक महिला बचत गट,आदिशक्ती महिला बचत गट आदींविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची जिल्हा पुरवठा अधिकार्यांतर्फे स्वतंत्र चौकशी करण्यात आली, त्यामध्ये ही दुकाने चालवणारे दोषी ठरले.चौकशीमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याचे आढळून आले.त्यामुळे रास्तभाव दुकान चालवणारा आनंद जैस्वाल ( उमराळे ) श्रमिक महिला बचत गट ( माणिकपूर ), महालक्ष्मी महिला बचत गट ( माणिकपूर ) आदिशक्ती महिला बचत गट ( माणिकपूर ) सरस्वती महिला बचत गट यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.लोकांची गैरसोय होऊ नये,यासाठी ही रास्तभाव दुकाने नजीकच्या रास्तभाव दुकानाशी तात्पुरत्या स्वरूपात जोडण्यात आली आहेत,अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी पोपट ओमासे यांनी दिली आहे.ज्या दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार झाला होता आहे,चौकशी करून त्यांचे शिधावाटप दुकानाचे परवाने रद्द करण्यात आले आहेत,अशी माहिती वसईचे पुरवठा निरीक्षक भागवत सोनार यांनी दिली आहे.
अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचे वितरण करण्यात येत असते. या धान्याचे वितरण करण्यासाठी वसईत १८० शिधावाटप दुकाने आहेत. भारतीय खाद्य निगम ( एफ.सी.आय.) बोरीवली येथून धान्य या शिधावाटप दुकानात पोहोचवले जाते आणि नंतर ते नागरिकांना वितरीत करण्यात येते.मात्र हा ट्रक अन्य ठिकाणी उतरवण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.ज्या ठिकाणी धान्य उतरवण्याचे चलन नसतानाही वसईतील अन्य धान्यदुकानात धान्याच्या गोणी उतरवल्या जात होत्या. काही दुकानात निश्चित धान्यापेक्षा कमी धान्य उतरवले जात होते.या प्रकाराबाबत वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार पुरवठा विभागाकडे केली होती आणि त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला.

