सचिन परब,विरार
वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत स्वच्छता रँकिंग स्पर्धेला सुरुवात…
वसई विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग, संयोगी संस्था अलाईट सोल्युशन सर्विसेस यांच्या संयुक्त सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ वसई विरार अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी,स्वच्छता रँकिंग स्पर्धा घेण्यात येत आहे.
या स्पर्धेमध्ये,शाळा, महाविद्यालये,हॉटेल, रुग्णालय,भाजी मार्केट,मॉल, सोसायटी,शासकीय कार्यालय,खाजगी कार्यालय इ. सहभागी झाले आहेत.
वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाने जनजागृती मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबवणे सुरू केले आहे.या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरातील नागरिकांना स्वच्छता पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापनाबद्दल जागरूक करणे आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे विविध संस्था आणि ठिकाणांसाठी सर्वोत्तम कार्यगतिक प्रदर्शित करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात येत आहे.या सन्मानाचा उद्देश नागरिकांना प्रोत्साहन करणे हा आहे.जेणेकरून स्वच्छतेच्या बाबतीत व वसई विरार शहरातील गुणांकन सुधारण्यास मदत होईल. यामध्ये प्रत्येक संस्थेने आपापल्या स्तरावर उत्तम कार्य करण्याचा आणि स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करावा,असे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
प्रभाग समिती ए ते आय मध्ये ही स्पर्धा सुरु झाली आहे.
वसई विरार महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सातत्याने उपक्रम राबवत असून विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करत आहे.त्याच बरोबर शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी शहरात सुशोभीकरण केले आहे. यामुळे पालिकेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या स्पर्धेला विविध संस्थेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

