सुरेश काटे,तलासरी
खाजगी परीक्षाकेंद्रे बदलण्याची उमेदवारांची मागणी,
पालघर जिल्ह्यालगत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदाच्या परीक्षा फेब्रु.व मार्च महिन्यात आयोजित करण्यात आली आहॆ.या परीक्षेसाठी आयबीपीएस कंपनीची नेमणूक झाली असताना अधिकृत परीक्षा केंद्र न देता खाजगी केंद्रावर परीक्षा ठेवण्यात आली आहे.
दुय्यम व कनिष्ठ अभियंता ही अत्यंत महत्त्वाची पदे असून त्यासाठी खाजगी गल्लीबोळात देण्यात आलेल्या परीक्षाकेंद्रामुळे परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे.
एकीकडे महाराष्ट्रातील गरीब विद्यार्थी ९०० ते १००० रु.फी भरून विद्यार्थी चार ते पाच वर्षे तयारी करतात आणि अशा प्रकारे परीक्षा केंद्र मिळत असतील तर हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवर खूप मोठा अन्याय आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
परीक्षेसाठी आयबीपीएसतर्फे अधिकृत टीसीएस आयओएन’ केंद्रासारखे पर्याय असताना राज्यभरातील अनेक खाजगी संगणक केंद्रांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.खाजगी संगणक केंद्रामध्ये परीक्षा घेतल्याने मृद व जलसंधारण विभाग, तलाठी भरती व सार्वजनिक बांधकाम विभाग भरती परीक्षांमध्ये झालेला गैरप्रकार मुंबई महानगरपालिकेच्या भरतीसाठीच्या परीक्षेत होण्याची शक्यता उमेदवारांमधून व्यक्त होत आहे.
मृद व जलसंधारण विभागाच्या भरतीप्रक्रियेत गैरप्रक्रार घडल्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्याची वेळ विभागावर आली होती.या सर्व प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे वर्षे वाया जाते.या सर्व गोष्टीचा विचार करून नगरविकास विभागाच्या नगर रचना सहाय्यक या पदाच्या परीक्षेसाठी दिलेली खाजगी केंद्रावरील परीक्षा पुढे ढकलून टीसीएस आयओएन च्या अधिकृत केंद्रावर घेण्यात आली होती. सदर परीक्षा ही टीसीएस आयओएन अधिकृत केंद्रांवरच घ्यावी,या बाबत सर्वस्वी जबाबदारी घेत पालिकेने अधिकृत रित्या घेऊन शुद्धीपत्र प्रसिध्द करावी,अशी विनंती महाराष्ट्रातील बेरोजगार अभियंते तसेच इंजिनिर्स असोसिएशन विद्यार्थी संघटनेने केली आहे.
