अनंत भोईर,पालघर,
कॉपीमुक्त अभियान निकोप पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रु.- मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा ११ ते १८ मार्च २०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा २१ फेब्रू.ते १७ मार्च २०२५,या कालावधीत पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक,लातूर व कोकण या विभागीय मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आहेत.त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्याबाबत शिक्षण विभागाने आवाहन केले आहे.मात्र हे अभियान निकोप वातावरणात पार पाडले जावे, यासाठी सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे,यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला काही मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे.
कोरोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८ ते २०२४ दरम्यान झालेल्या परीक्षांमध्ये ज्या केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत,अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
फेब्रु.- मार्च २०२५ च्या इ.१० वी व इ.१२ वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षाकेंद्रांवर गैर प्रकरणे आढळून येतील,त्या केंद्राची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात इ.१० वी व इ.१२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहणार आहॆ.
जिल्हाधिकारी गोविंद बोडके, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती पंकज कोरे,शिक्षणाधिकारी माध्यमिक संगीता भागवत यांनी सदर सूचनांची अंमलबजावणी योग्य रीत्या करण्याचे आवाहन केले आहे.

