राजू परेड,जव्हार,
व्यवसायिक असिफ शेख यांनी विद्यार्थ्यांना सांगितला यशाचा राजमार्ग,
के.व्ही.हायस्कूल व आर.वाय. ज्युनियर कॉलेज येथे व्यवसाय करिअर मार्गदर्शन सप्ताहात दुसरे पुष्प गुंफतांना यशस्वी व्यावसायिक आसिफ रशीद शेख यांनी समाजमध्यामावरील रिल हे वास्तव जीवन नसून स्वतःचे प्रतिकूल परिस्थितीत जीवन हे वास्तव आहे,त्याला धैर्याने सामोरे जा असे आवाहन केले.
शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य अवधूत गावड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आजच्या काळात आपण थोड्याशा प्रयत्नामध्ये यशाची स्वप्न पाहू लागतो त्यामुळे अपयश पदरी पडल्यानंतर निराश होतो. आपण निराश न होता ” प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे,” या उक्तीप्रमाणे आपल्या कठोर प्रयत्नामध्ये सातत्य ठेवल्यास आपणास नक्कीच यश मिळेल,याचा विश्वास आपल्या मनामध्ये जागवणारे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे वक्ते.यशस्वी व्यावसायिक व शाळेचे माजी विद्यार्थी आसिफ रशीद शेख आहेत.आसिफ शेख यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कठोर मेहनत करण्याची तयारी, प्रामाणिकपणा व मनमिळाऊ स्वभाव या गुणांच्या गुणांच्या जोरावर एक यशस्वी व्यावसायिक,ही प्रतिमा पंचक्रोशीमध्ये निर्माण केली आहे.या यशस्वी व्यवसायिकाचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून आपले पुढील भविष्याची दिशा निश्चित करावी,असे आवाहन केले.आसिफ शेख यांच्या मनामध्ये आपल्या शाळेविषयी प्रचंड प्रेम आपुलकी व जिव्हाळा असून त्यांच्या दानशूरपणाचे कौतुक करत प्राचार्यांनी शाळेतर्फे त्यांचा यथोचित सत्कार केला.
करिअर मार्गदर्शन सप्ताहाचे दुसरे पुष्प गुंफताना यशस्वी व्यावसायिक आसिफ शेख यांनी आजचा जमाना मोबाईल असला तरी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त ज्ञान प्राप्तीसाठी केला पाहिजे. समाजमाध्यमावरील रिल हे वास्तव जीवन नसून आपण प्रत्यक्षात जगतो ते प्रतिकूल परिस्थितीत जीवन हे वास्तव आहे,हे सत्य स्वीकारून प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे.जीवनात ध्येय निश्चिती करुन वेळप्रसंगी झोप,आवडीचे पदार्थ व भौतिक सुविधांचा त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे.अभ्यासवृत्ती स्वीकारा,आपल्यातील आत्मविश्वासाची पातळी उंचावत ठेवा,सकारात्मक विचार अंगी रुजवा,साधी राहणी व उच्च विचासरणीचा अंगीकार करा,आई – वडील व गुरुजन यांच्या समोर नतमस्तक व्हा,हा यशाचा राजमार्ग आहे.वाचन वाढवा त्यातून संवाद कौशल्य विकसित होईल व आपल्या आपल्या मार्गातील अडचणी दूर करता येतील,असे सांगितले.
आसिफजी यांनी सांगितले की, व्यवसायाच्या प्रारंभीच्या काळातील बिकट अडचणीमुळे लढण्याचे बळ मिळाले, त्यामुळे व्यवसायात टिकून राहिलो व आज शासनाच्या वन, सार्वजनिक बांधकाम, विद्युत, पोलीस, आरोग्य, क्रीडा व जिल्हा परिषदेचे विविध विभाग यांची कामे मिळवून यशस्वीपणे पूर्ण करू शकलो.
आसिफजी यांचे स्वानुभव ऐकण्यात विदयार्थी व शिक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवतीला शाळेच्या गीतामांचाच्या विद्यार्थीनींनी सुमधुर स्वरात स्वागत गीताने पाहुण्याचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजचे शिक्षक सुधीर भोईर यांनी केले व शिक्षक संतोष यादव यांनी आभाप्रदर्शन केले.

