दीपक मोहिते,
” अजातशत्रू,”
अटलबिहारी वाजपेयी ; सृजनशील मनाचा सुधारणावादी नेता,
भाजपचे थोर नेते,विचारवंत व देशाचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज शंभरावी जयंती आहे.त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत तीनवेळा पंतप्रधानपद भूषवले.१९९६,१९९८ व १९९९,असे तीन वेळा ते पंतप्रधान झाले.प्रखर राष्ट्रवादी,पत्रकार,साहित्यिक व यशस्वी राजकारणी, अशी त्यांची राजकीय वाटचाल राहिली.खासदार म्हणून त्यांनी चाळीस वर्षे संसदेत त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला.
आजीवन अविवाहित राहून त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी देशभर प्रचार केला.१९९९ साली त्यांनी २४ राजकीय पक्षाची एकत्रित मोट बांधत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना केली.त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्यरत असताना ११ व १३ मे १९९८ दरम्यान पोखरण येथे पाच अणुस्फोट करून भारत अणुशक्ती संपन्न देश असून आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने कधीही बघू नका,असा एकप्रकारे संदेश दिला.या घटनेने जगातील सारे देश चकित झाले.हे स्फोट करताना त्यांच्या सरकारने जी गोपनीयता बाळगली,त्यावरून त्यांच्यात असलेला धुर्तपणा पाहायला मिळाला.त्याकाळात विकसित देश उपग्रहाच्या साहाय्याने हेरगिरी करत असत,पण त्यांना देखील सुगावा लागू शकला नव्हता.सतत युद्धाची परिस्थिती आपल्याला परवडणारी नाही,हे लक्षात घेऊन त्यांनी शेजारच्या देशाशी चांगले संबंध ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केला.१९ फेब्रु.१९९९ रोजी सदा-ए-सरहद,या नावाने त्यांनी दिल्ली-लाहोर अशी बससेवा सुरू केली.पहिल्या फेरीत त्यांनी स्वतः प्रवास करून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेऊन भारत-पाक संबंध सुधारण्यासाठी पहिले पाऊल टाकले.मात्र त्यांचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल येथे छुपे युद्ध सुरू करून आपल्या पाठीत सुरा खुपसला,पण आपल्या सैन्याने त्यांची पळता भुई थोडी केली.या युद्धात पाकची अतोनात मनुष्यहानी झाली.अटलबिहारी वाजपेयी हे द्रष्टे नेते होते,त्यांनी आपल्या कार्यकाळात स्वर्णिम चतुष्कोन परियोजनाची सुरुवात केली.या योजनेंतर्गत दिल्ली,कलकत्ता,चेन्नई व मुंबई,या चार शहरांना राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येणार होते.तसेच कावेरी पाणीतंटा,नवीन राष्ट्रीय महामार्ग,विमानतळ,औद्योगिक विस्तारीकरण,टेलिकॉम निती,कोकण रेल्वे,इ.महत्वाच्या विकासकामांना त्यांच्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले.त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा समिती,आर्थिक सल्लागार समिती व व्यापार/उद्योग,अशा तीन महत्वाच्या समित्या स्थापन केल्या.गृहनिर्माणसाठी त्यांनी अर्बन सीलिंग ॲक्ट बंद केला,तसेच विदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरी त्यांनी आयुर्विमा योजना कार्यान्वित केली.अशा या थोर नेत्यांचा १६ ऑगस्ट २०१८ मध्ये ९४ वर्षी निधन झाले.

