अश्विन नाईक रत्नागिरी,
” गोड आठवण, ”
साने गुरुजी ; असामान्य समाजसुधारक व आदर्श स्वातंत्र्यसेनानी
साने गुरुजींची आज जयंती,त्यांचा जन्म २४ डिसें.१८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या खेड्यात झाला.त्यांचे वडील हे कोर्टात काम करत असत,पण घरची आर्थिक स्थिती मात्र बेताचीच होती.साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या शिकवणीचा लहानपणापासून मोठा प्रभाव होता.त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर केलेल्या संस्कारामुळे गुरुजींचा जीवनविकास होत गेला.त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये एम.ए.ची पदवी मिळवली व ते शिक्षकी पेशात स्थिरावले.त्यांनी पहिली नोकरी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कुल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे नोकरी केली.
त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वावलंबन,सेवावृत्ती,या विषयीचे धडे दिले.१९२८ साली त्यांनी ” विद्यार्थी,” हे मासिक सुरू केले.त्यांच्यावर महात्मा गांधी यांचा मोठा प्रभाव होता.१९३० साली शिक्षकाची नोकरी सोडून ते सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सामील झाले.त्यांनी त्यावेळी ,” काँग्रेस,” नावाचे साप्ताहिक सुरू केले.त्याच सुमारास पडलेल्या दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी,म्हणून जोरदार प्रयत्न केले.१९४२ मध्ये भूमिगत राहून त्यांनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. त्यानंतर त्यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.त्याच सुमारास त्यांचे दुसरीकडे साहित्याचा प्रवासही सुरू होता.त्यांनी स्वातंत्र्याच्या ऐन लढाईच्यावेळी देशभक्तीपर कविता लिहिल्या,त्यांचा नागरिकांच्या मनावर चांगला प्रभाव झाला.ब्रिटिश सरकारच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रति जप्त केल्या.स्वातंत्र्यानंतर ते समाजवादी पक्षात दाखल झाले.आंतरभारती चळवळीच्या माध्यमातून भारत जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.विविध राज्यातील जनतेने एकमेकांची संस्कृती,भाषा समजून घ्यावी,असे त्यांना अभिप्रेत होते.त्यानंतर १९४८ मध्ये त्यांनी ” साधना,” साप्ताहिक मासिक सुरू केले.या मासिकाच्या साहित्यात मानवतावाद,सामाजिक सुधारणा व देशभक्ती ओतप्रोत भरलेली असायची.त्यांनी आपल्या हयातीमध्ये ७३ पुस्तके लिहिली.तुरुंगात असताना त्यांनी ” श्यामची आई,” ही सुप्रसिद्ध कादंबरी लिहिली.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते.अखेर त्यांनी ११ जून १९५० रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आपली जीवनयात्रा संपवली.

