दीपक मोहिते,
” मनपा निवडणुकीचे वेध,”
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका : राज्याचे लक्ष २२ जाने.रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सूनावणीकडे,”
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर आता राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे.ही व्यवस्था आणखी काही काळ सुरू ठेवणे,योग्य होणार नाही.त्यामुळे राज्य सरकार आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी प्रयत्नाला लागले आहे.या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात २२ जाने.२०२५ रोजी सुनावणी होणार आहे.
या सूनावणीमध्ये जर न्यायालयाने निवडणुका घेण्यासंदर्भात निर्णय दिल्यास राज्यातील २९ महानगरपालिका,२५७ नगरपालिका,२६ जिल्हा परिषदा,२८९ पंचायत समित्या व २७ हजार ९०० ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल.
महायुतीमधील घटक पक्षाना सध्या पोषक वातावरण आल्यामुळे या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता नाही.त्यामुळे राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसापूर्वी भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा,असे आदेश दिले.तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे दोघे बंधू या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकमेकांना मिठ्या मारण्याच्या तयारीत आहेत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस ( शरद पवार ) या दोघांची ताकद शहरी भागात नगण्य असल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी पासून फारकत घेण्याच्या तयारीत आहे.मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना भाजपकडून प्रचंड आव्हान मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे उद्धव व राज आपले वैर संपवून एकत्र येत आहेत.ठाणे महानगरपालिकेत त्यांचा सामना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी आहे.ठाणे हा शिंदे यांचा बालेकिल्ला आहे,तो भेदण्यासाठी उद्धव ठाकरे यांना राज यांची मदत होऊ शकते.नवी मुंबई महानगरपालिका ही वनमंत्री गणेश नाईक यांच्या ताब्यात असून ती जिंकणे,उद्धव ठाकरे यांना शक्य होणार नाही.त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा मुंबई व ठाणे या दोन महानगरपालिकेवर फोकस राहणार आहे.वसई विरार शहर महानगरपालिका ही गेली दहा वर्षे आ.हितेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहे.यंदा ती ताब्यात घेण्यासाठी भाजप पूर्ण तयारीनिशी रणांगणात उतरण्याची शक्यता आहे.भाजपचे विवेक पंडित,आ.राजन नाईक,आ.स्नेहा दुबे पंडित,आ.विलास तरे व संभाव्य पालकमंत्री या पाच जणांवर भाजप जबाबदारी देईल.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी महायुती विविध हातखंडे वापरेल.मात्र,खरा संघर्ष मुंबई व ठाणे या शहरात पाहायला मिळणार आहे.त्यामुळे राज्याचे लक्ष आता २२ जाने.रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सूनावणीकडे लागले आहे.

