दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर जिल्ह्याचे दुःख संपणार तरी कधी ?
पालघर जिल्ह्याला यंदाही मंत्रिपद न लाभल्यामुळे सलग चौथ्यांदा बाहेरचा पालकमंत्री लादला जाणार, हे आता निश्चित झाले आहे.त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचे नाव चर्चेत आहे. पालघर जिल्ह्याला प्रत्येक सरकारने कायम सावत्रपणाची वागणूक दिली.जिल्ह्याचा पालकमंत्री,हा त्याच जिल्ह्याचा मंत्री असावा,अशी सर्वसाधारण अपेक्षा असते.कारण त्या मंत्र्याला जिल्ह्यातील समस्या,प्रश्न व लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणींची कल्पना असते.पण गेल्या दहा वर्षात पालघर जिल्ह्याच्या वाट्याला मंत्रिपद आले नाही.तत्कालीन आदिवासी विकासमंत्री कै.विष्णू सवरा यांनी काही काळ पालकमंत्री म्हणून काम पाहिले,त्यानंतर मालेगावचे दादा भुसे व ठाणे जिल्ह्याचे रविंद्र चव्हाण,हे दोघे पालकमंत्री झाले.
कोरोना काळात पालकमंत्री दादा भुसे,हे क्वचितच पालघर जिल्ह्यात पाहायला मिळत असत.त्यामुळे त्याकाळात कोरोना निर्मूलन व उपाययोजना या महत्वाच्या कामांचा बोजवारा उडाला.कार्यवाहीची सारी मदार त्या काळात शासकीय यंत्रणांवर होती,त्यामुळे पालघरवासीयांना बरंच काही सोसावे लागले.त्यानंतर रविंद्र चव्हाण आले,पण त्यांनाही फारशी विकासकामे करता आली नाहीत.सरकारी अधिकारी त्यांचे ऐकत नसत,त्यामुळे एका बैठकीत त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला.जिल्हा व नियोजन समितीच्या बैठकीत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची तयारी करून न आलेल्या अधिकाऱ्यावर त्यांनी आगपाखड करत बैठक पुढे ढकलली होती.प्रशासकीय यंत्रणेचा असा हा मुर्दाडपणा म्हणजे पालकमंत्र्यांचे अपयश होते.त्यामुळे मागे जे काही घडलं,त्याची यंदा पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.आज जिल्ह्यात,पाणी,कृषी,
आरोग्य,शिक्षण,
दळणवळण,कुपोषण,बालमृत्यू,गरोदर मातांचे मृत्यू, रोजगार व उद्योगधंदे वाढ,इ.प्रश्न आ वासून उभे ठाकले असताना जिल्ह्याला साधं राज्यमंत्रीपद मिळू नये,हे पालघरवासीयांचे दुर्देवच म्हणावं लागेल.

