दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
छगन भुजबळ ” दे धक्का,” देण्याच्या तयारीत…
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर संतापलेल्या छगन भुजबळ यांनी आता महायुती सरकारला ” दे धक्का,” देण्याची तयारी चालवली आहे.सध्या ते ओबीसी समाजाच्या नेत्यांसोबत सतत बैठका घेत असून शरद पवार गटात सामील होणे किंवा स्वतःची ओबीसी संघटना उभी करणे,अशा दोन पर्यायावर विचार करत आहेत.
या दोन पर्यायापैकी ओबीसी संघटना उभारून राजकारणात सक्रिय होण्याचे त्यांनी ठरवले तर ते महायुतीला फार मोठा धक्का ठरू शकतो.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने महायुतीला भरभरून मते दिली होती.ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये,यासाठी छगन भुजबळ यांनी एकाकी किल्ला लढवला होता.मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांना त्यांनी अनेकदा अंगावर घेतले.तसेच सरकारच्या वतीने भुजबळ यांनी जरांगेवर प्रखर हल्ले चढवले.मात्र निवडणुकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी भुजबळ यांना एकाकी पाडत,मंत्रीपदापासून दूर ठेवले.त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अंगाची लाही लाही झाली असून त्यांनी महायुतीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.छगन भुजबळ हे राज्याच्या राजकारणात अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.मंडल आयोगाच्या प्रश्नावरून त्यांनी १९८० च्या काळात बाळासाहेबांना आव्हान देत सेनेला सोडचिठ्ठी दिली होती.त्याकाळी सेनेला आव्हान देणे,म्हणजे जीवाचे बरेवाईट करून घेण्यासारखे होते.श्रीधर खोपकर यांच्या हत्येमुळे भयभीत झालेले भुजबळ हे काही काळ भूमिगत झाले होते.अशावेळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांना संरक्षण दिले.भाजपच्या कमंडलू ( राममंदिर उभारणी ) राजकारणाला शह देण्यासाठी भुजबळ यांचा आपल्याला उपयोग होऊ शकतो,हे लक्षात घेऊन पवार यांनी आपल्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिले.पण कालांतराने महाराष्ट्र सदन व तेलगी प्रकरणामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली.त्यांना प्रदीर्घ काळ तुरुंगात काढावा लागल्यामुळे ते शरद पवारावर नाराज होते.अजित पवार यांच्या बंडानंतर ते त्यांच्या गटात सामील झाले.त्यानंतर लोकसभा निवडणुकीत त्यांनी नाशिकहुन उमेदवारी मागितली होती,पण अजित पवार यांनी त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि आता त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे टाळले.त्यामुळे भुजबळ आता अजित पवार यांना धडा शिकवण्याच्या तयारीला लागले आहेत.मराठा समाज हा महायुतीपासून दुरावला असताना ओबीसी समाजही लांब गेला तर त्याचा फटका अजित पवार गटाला बसण्याऐवजी भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे.ही सर्व परिस्थिती लक्षात भाजप त्यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे. तसे झाल्यास अजित पवार गटाला आगामी काळात ते डोकेदुखी ठरू शकतील,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

