दीपक मोहिते,
” भयावह वास्तव,”
नंदुरबार येथे कुपोषणामुळे ३८९ आदिवासी बालके कुपोषणामुळे मृत्युमुखी,
राज्यातील नंदुरबार,नाशिक,पालघर, अमरावती व गडचिरोली हे पाच जिल्हे आदीवासीबहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात.मूलनिवासी अशी ओळख असलेल्या या समाजातील बालकांना कुपोषणाचा शाप पाचवीला पुजला आहे.गेल्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ३८९ बालके मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक वृत्त प्रसिद्ध झाले आहे.गेल्या सात दशकात समाजाला लागलेला हा शाप नाहीसा, करण्यासाठी सरकारने आजवर हजारो कोटी रु.खर्च केले,पण कुपोषण आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.
कुपोषणाचे मूळ,हे या समाजाच्या अज्ञानात दडलं आहे,कमी वयात मुलींची लग्ने करणे,गरोदरपणात काळजी न घेणे व अन्य कारणे आहेत.पण समाज आपली संस्कृती व चालीरीती,याविषयी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे समाजात याविषयी योग्य ते प्रबोधन होऊ शकले नाही.त्यामुळे कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी सतत वाढत आहे.सरकारने काही वर्षांपूर्वी आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधावा,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदिवासी विकास मंत्रालय स्थापन केले.त्यासाठी गेल्या पासष्ठ वर्षात सरकारने आपल्या प्रत्येक अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली.पण हा आजार मात्र नियंत्रणात येऊ शकला नाही.या विभागाच्या अंतर्गत जिल्हानिहाय बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्यावर प्रचंड निधी खर्च करण्यात आला.अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना पोषण आहार दिला जातो.त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे व पूरक आहार देखील दिला जातो.अशाप्रकारच्या उपाययोजनेनंतरही परिस्थितीत फरक पडू शकला नाही.त्यामुळे सरकारने या समाजात जनजागृती व प्रबोधन,अशा दोन स्तरावर प्रयत्न करायला हवेत.नंदुरबार जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या ३८९ बालकांसंदर्भात सरकारने विशेष समिती स्थापन करून चौकशी करावी,अशी या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांनी केली आहे.

