दिपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
शिवसेनेकडून ( उबठा ) वेगळी चूल मांडण्याचे संकेत,
विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाविकास आघाडीच्या विघटनाला आता चांगलाच वेग आला आहे.आपला पराभव हा हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या धर्मनिरपेक्ष पक्षाशी साथसंगत केल्यामुळे झाल्याचा साक्षात्कार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला आहे.त्यामुळे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये वेगळी चूल मांडण्याची तयारी चालवली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,हा उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला असून ते आता ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत आले आहेत.दोन दिवसांपूर्वी त्यांनी ” काँग्रेस पक्षाने वीर सावरकर यांची निंदानालस्ती करणे,थांबवावे असे वक्तव्य केले.त्यांचे हे वक्तव्य पुन्हा ते ” कडव्या हिंदुत्वाकडे,” वळत असल्याचे संकेत मिळत आहेत.आपल्या पक्षाचे धर्मनिरपेक्ष पक्षासोबत जाणे,लोकांच्या गळी उतरू शकले नाही,त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपला दारुण पराभव झाला,असे त्यांच्या खासदार,आमदार,नेते,
उपनेते,माजी नगरसेवक व अन्य पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्यानंतर त्यांनी वेगळा निर्णय घेण्याची तयारी चालवली आहे.पण आजच्या घडीला स्वबळावर निवडणुका त्यांनी लढवल्या,तर त्यांना फारसे यश मिळेल,असे वाटत नाही.लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश आपण विधानसभा निवडणुकीत का टिकवू शकलो नाही व आपले काय चुकले,या दोन विषयावर महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांनी एकत्र बसून विचारमंथन करण्याची आवश्यकता होती.पण गेल्या महिनाभरात तशी बैठक झाल्याचे ऐकिवात नाही.लोकसभेत मिळालेल्या विजयाने शरद पवार गट वगळता उद्धव ठाकरे यांची शिवसेना व कॉग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते अक्षरशः हवेत उडत होते.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,हे तर सोबत असलेल्या घटक पक्षांवर तोंडसुख घेण्यात धन्यता मानत होते.लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे नाना पटोले हे ” विजयाचे शिल्पकार,” आम्हीच,अशी शेखी मिरवत राज्यभर मिरवत होते.तसेच त्यांचा व सेनेचे संजय राऊत या दोघांच्या तोंडाचा पट्टा शेवटपर्यंत सुरू होता.त्यामुळे जागावाटपाच्या कामात प्रचंड रस्सीखेच झाली.मुंबई शहरात सेनेला त्यांच्या ताकदीनुसार जागा मिळायला हव्या होत्या,पण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी अत्यंत ताठर भूमिका घेतल्यामुळे महाविकास आघाडीला जबर फटका बसला.त्यामध्ये सर्वाधिक नुकसान उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे झाले.त्यामुळे आता त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

