दिपक मोहिते,
” दृष्टिक्षेप,”
२०२४ साल ; कटू व गोड घडामोडीचे..
२०२४ साल संपायला आता केवळ ११ दिवस शिल्लक आहेत.पण आतापासूनच नववर्षाचे स्वागत करण्याची जय्यत तयारी नागरिकांनी चालवली आहे.नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून आपण जोपासत आलो आहोत.वास्तविक हिंदू चालीरीती व संस्कृतीनुसार आपले नववर्ष हे चैत्र महिन्यास सुरू होते.पण जगभरातील देशात ते १ जाने.पासून सुरू होते आणि ही प्रथा आता आपल्या देशातही रूढ झाली आहे.३१ डिसें.रोजी मध्यरात्री १२.०० वाजता सरत्या वर्षाला बाय,बाय व १२.०१ मिनिटाने नववर्षाचे स्वागत,असा हा सोहळा असतो आणि तो आपण मोठ्या आनंदात साजरा करत असतो.
गतवर्षाच्या कडू आठवणीना बाजूला सारत या दिवशी आपण विविध उपक्रम राबवत नववर्षाचे मोठ्या जोशात स्वागत करतो.हे करत असताना सरत्या वर्षात घडलेल्या घडामोडी,मग त्या राजकीय असोत,विकासाच्या असोत किंवा दैनंदिन जीवनातील समस्या असोत,
त्याचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.एकंदरीत ते वर्ष मानवी जीवनाला फलदायी ठरले,की त्रस्त ठरले,याचा लेखाजोगा लोकांसमोर मांडणे आवश्यक असते.त्यानुसार आपण या लेखात त्याचा उहापोह करणार आहोत.
गेले वर्ष निवडणुकीचे वर्ष होते,लोकसभा त्यामागोमाग विधानसभा निवडणुका झाल्या.सत्तेत बदल होईल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण तसे काही झाले नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले ” अबकी बार,चारसो पार,” चे त्यांचे स्वप्न हे दोनशे चाळीसवर येउन थांबले व त्यांना चन्द्रबाबू नायडू व नितीशकुमार यांच्या पक्षाच्या कुबड्या घ्याव्या लागल्या.त्यांनी त्या घेतल्या व विरोधकांचे स्वप्न मातीत गाडले गेले.पण महाराष्ट्रात मात्र भाजपची चांगलीच पीछेहाट झाली.लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाने विरोधकांनी जल्लोष करत विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करण्यासाठी कंबर कसली.पण लाडक्या बहिणीने त्यांची पार वाताहत करन टाकली.विधानसभा निवडणुकीत या बहिणींनी त्यांना ६० जागांचा पल्ला देखील गाठू दिला नाही.महायुतीच्या या विजयाचे ” लॅन्डस्लाईड व्हिक्टरी,” असं वर्णन केल्यास ते चुकीचे ठरणार नाही.गेल्या वर्षात घडलेल्या या दोन्ही घडामोडी ठळक ठरल्या.कारण जगाचे लक्ष या दोन निवडणुकांकडे लागले होते.
गेल्या वर्षभरात आर्थिक आघाडीवरील चित्र फारसे उत्साहजनक नव्हते.महागाई नियंत्रण व विकासदर वृद्धी,याविषयी केंद्र सरकारची कामगिरी निराशाजनक राहिली.सरत्या वर्षात सरकारचे धोरण हे मूठभर उद्योगपतींना झुकते माप देणारे ठरले.अनेक सार्वजनिक उपक्रम बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्यात केंद्र सरकारने धन्यता मानली.या काळात कृषी क्षेत्रही अस्थिर झाले,शेतमालाला हमी भाव देण्याच्या प्रश्नी केंद्र सरकारने सतत चालढकल केली.त्यामुळे शेतकरीवर्ग मोदी सरकारवर नाराज आहे.कांदे,सोयाबीन,तूर,
कापूस
मका,इ.कृषी उत्पन्ने कायम हेलकावे खात राहिली.विकासदरातही फारशी वाढ होऊ शकली नाही.डॉलरच्या तुलनेत रुपया अत्यंत क्षीण होत गेला.आता एका डॉलर्ससाठी भारतीयांना लवकरच १०० रु.मोजावे लागणार आहेत.तसेच रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातही फारशा सुधारणा होऊ शकल्या नाहीत.
या काळात परराष्ट्र धोरण मात्र कणखर राहिले.अनेक प्रश्नी पाश्चात्य देशांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला,पण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.आजच्या घडीला आपले परराष्ट्र धोरण दक्षिण आशिया खंडात प्रभावी ठरले आहे.आपल्या शेजारी असलेल्या बांगलादेश,पाकिस्तान,
नेपाळ,म्यानमार,श्रीलंका,
मालदीव,या देशात सध्या जे काही चालले आहे,त्याचा परिणाम आपल्या देशावर होऊ न देण्यात मोदी सरकारने केलेली कामगिरी,ही नक्कीच कौतूकास्पद अशीच आहे.
महाराष्ट्र राज्यात मात्र गेल्या वर्षभरात कायदा व सुव्यवस्थेचा पार बोजवारा उडाला.बदलापूर बलात्कार,पुण्यात कोयता गँगचा हैदोस,हिट अँड रन,च्या घटना,हत्या,इ.कारणामुळे शिंदे सरकारची विश्वासार्हता पार लयाला गेली.कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राखणे,गृहखात्याला शक्य झाले नाही. गृहमंत्री फडणवीस यांचे हे अपयश आहे,अशी टीका झाली,ती रास्तच असून त्यास फडणवीस हेच सर्वस्वी जबाबदार आहेत.बीड येथे संतोष देशमुख यांची झालेली हत्या व परभणी येथे झालेल्या भारतीय संविधानाची विटंबना व त्यावरून झालेली दंगल,या दोन घटना सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत.

