दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सत्तेत आलात,आता जिल्ह्याची विकासकामे जलदगतीने मार्गी लावा..
वसई,नालासोपारा व बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा पराभव होऊन महायुतीची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.तसेच महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून जून २०२० पासून सलग चार वर्षे सरकार कारभार चालवत आहे.स्वतःकडे सत्ता असूनही महायुती व अन्य काही पक्षाचे स्थानिक नेते मात्र महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराबद्दल आ.हितेंद्र ठाकूर याना दोषी ठरवत होते.
वास्तविक पालकमंत्री, खासदार,पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाचे आमदार हे सारे सत्ताधारी पक्षाचे आहेत.तरीही त्यांच्या नजरेत केवळ आ.हितेंद्र ठाकूर दोषी…
आता नव्याने निवडून आलेले आमदारही त्यांच्याच पक्षाचे आहेत.त्यांच्या कार्यकालात विकासकामाना गती न मिळाल्यास लोकांनी या मंडळींना जबाबदार धरायला हवे.नवनिर्वाचित आमदारांनी पाणी,इस्पितळ,अनधिकृत फेरीवाले,अनधिकृत रिक्षा,वाहतूककोंडी,वसई -भाईंदर जुना रेल्वेपूल,जिल्हा परिषद शाळांचे महानगरपालिकेकडे हस्तांतरण,ग्रामीण भागात बंद पडणाऱ्या जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळा,मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व डागडुजी,इ.
विकासकामांसाठी सरकार दरबारी आपले वजन वापरून मुबलक प्रमाणात आर्थिक निधी मिळवावा.जेणेकरून आर्थिक निधी मिळून,ही सारी विकासकामे मार्गी लागतील व तिन्ही मतदारसंघाच्या विकासाला गती मिळू शकेल.आज राज्यात तुमचे सरकार आहे.जिल्ह्यात सहापैकी पाच मतदारसंघ तुमच्या ताब्यात आहेत.खासदार देखील तुमचाच आहे,त्यामुळे निधी मिळवताना या लोककप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागणार नाही.लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊन केवळ सहा महिन्यांचा काळ लोटला आहे,त्यामुळे या लोकप्रतिनिधींकडून ताबडतोब आउटपुट मिळावी,अशी अपेक्षा नाही.पण वर्ष झाले की हे न्यूजपोर्टल,त्यांना नक्की जाब विचारणार आहे.खा.हेमंत सवरा,हे गेल्या सहा महिन्यात विविध खात्याच्या केंद्रीय नेत्यांना मागण्याचे निवेदन देताना जिल्हावासीयांना पाहायला मिळाले.त्यांच्या मागण्याची पूर्तता किती झाली ? हे देखील लोकांना कळायला हवे.

