दीपक मोहिते,
“इनसाईड स्टोरी,”
” आता थेट तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची गरज,”
वसई,नालासोपारा व बोईसर,या तीन विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आ.हितेंद्र ठाकूर यांनी वसई व नालासोपारा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मेळावे घेतले.या माध्यमातून आपल्या पराभवाची नेमकी कारणे काय आहेत,हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.पण त्यातून नेमके काय निष्पन्न झाले,ते मात्र कळायला मार्ग नाही.मात्र येणाऱ्या काळात भाजपच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर यांना मोठ्याप्रमाणात झाडाझडती करावी लागणार आहे.या प्रक्रियेची सुरुवात त्यांना त्यांच्या नजीकच्या वर्तुळातील नेते विभागीय नेते व नगरसेवक यांच्यापासून करावी लागणार आहे.
आ.ठाकूर हे आपल्या प्रत्येक भाषणात ” माझा कार्यकर्ता जोवर माझ्या सोबत आहे,तोवर माझा कोणीही पराभव करू शकत नाही,” असे आवर्जून सांगत असायचे.गेल्या तीस वर्षाच्या त्यांच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास ते खरंच होतं.पण यावेळी अस काय घडले ? प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहणारे विविध समाज व जातीधर्माचे लोक त्यांच्यापासून का
दुरावले ? याविषयी चिंतन करणे आवश्यक आहे.वास्तविक कोरोना काळात आ.ठाकूर यांनी आपले सर्वस्वी पणाला लावले व सुमारे ७५ लाख लोकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली.राजकारणासोबत त्यांनी कायम समाजकारणाची जोड दिली.दुष्काळ,अतिवृष्टी,
भूकंप व विविध नैसर्गिक संकटसमयी त्यांनी सढळ हस्ते मदत केली व कायम लोकांच्या पाठीशी उभे राहिले.वसई तालुक्यात गेल्या तीन दशकात त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली.अपक्ष आमदार असल्यामुळे त्यांना सरकारकडून आर्थिक निधी मिळवताना कायम उपेक्षित वागणूक मिळाली.त्यामुळे काही विकासकामे रखडली.आपल्याला विकासकामांसाठी निधी देताना सरकार हात आखडता घेत असल्याचे माहीत असूनही त्यांनी प्रत्येक सरकारच्या मदतीसाठी आपल्या तीन आमदारांची कुमक देऊ केली.सत्ताधारी पक्षाला ते कायम सहयोगी पक्ष म्हणून साथ देत आले.राज्यसभा,
विधानपरिषद,पदवीधर,
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आमदार निवडणूक प्रक्रियेत देखील ते सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना आपली मते देत आले.त्यांची ही साथसंगत त्यांना त्रासदायक ठरत असताना देखील त्यांनी सरकारविरोधात कधीही भूमिका घेतली नाही.कारण आपला पराभव करणे,याना कदापि शक्य नाही,असा त्यांचा ठाम विश्वास होता.कारण,त्यांचा आपले वरिष्ठ नेते,विभागीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर त्यांचा भरोसा होता.पण या निवडणुकीत मात्र त्यांच्या या विश्वासाला तडा गेला व अघटित घडले.त्यांच्या या पराभवाला गेल्या काही वर्षात वरिष्ठ नेते, पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये आलेला मरगळपणा व या तिघांनी कमावलेला गडगंज पैसा,अशी दोन महत्वाच्या बाबी कारणीभूत ठरल्या.” गरजेपेक्षा अधिक पैसा आला की उन्मत्तपणा येतो,” हे या तिघांनी दाखवून दिले.त्यामुळे पक्षाची सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेली नाळ तुटत गेली.पदाधिकारी,
नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली दरी कायम रुंदावत गेली.” जर पदाधिकारीच मोठे होणार असतील,तर आम्ही का म्हणून राब राब राबायचे ? अशा निर्णयाप्रत सर्वसामान्य कार्यकर्ता आला व येथेच घात झाला.एखादा कार्यकर्ता काम घेऊन पदाधिकाऱ्याकडे गेला तर पदाधिकारी त्याला थारा देत नसत,त्यामुळे तो कार्यकर्ता जर थेट आमदाराकडे गेला तर आमदार त्यांना पुन्हा त्याच पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटा,असे सांगायचे.त्यामुळे तो कार्यकर्ता पुन्हा त्या पदाधिकाऱ्यांकडे येतो,तेंव्हा तो पदाधिकारी थेट त्यांच्या अंगावर खेकसतो,तू स्वतःला शहाणा समजतोस का ? थेट आप्पाला जाऊन भेटतोस ? त्यामुळे ज्या लोकांचे काम घेऊन तो कार्यकर्ता त्याच्याकडे आलेला असतो,त्याचा सर्वांसमोर झालेला पाणउतारा,हा त्या कार्यकर्त्याला सहन होत नाही,आणि येथून कार्यकर्त्यांचे दुरावणे सुरू होते.आज अनेक कार्यकर्ते थेट आमदाराला भेटायला घाबरत आहेत.परिणामी आ.ठाकूर यांना स्थानिक पातळीवर काय चाललंय,हे कळू शकले नाही.गेल्या सहा विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेचा मी साक्षीदार आहे.प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात मी कार्यकर्त्यांचा उत्साह,मतदानाच्या दिवशी बुथवरील कार्यकर्त्यांची झुंबड,दुपारी २.०० नंतर मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर काढण्यासाठी त्यांची प्रचंड धावपळ पाहत आलो.पण या निवडणुकीत तसे चित्र मला कुठेही पाहायला मिळाले नाही.मतदानाच्या दिवशी अनेक जण गायब होते,अनेक बुथ ओस पडलेले पाहायला मिळाले.कारण कार्यकर्ते दुखावले गेले आहेत.सर्वाधिक विस्कळीतपणा,हा नालासोपारा विधानसभा मतदारसंघात मला पाहायला मिळाला.पक्षाने ज्या तरुणांकडे पश्चिम विभागाची जबाबदारी सोपवली होती,त्याचा उर्मटपणा व ” हम करे सो कायदा,” पद्धतीने काम करणे,पक्षाला हानिकारक ठरले.त्याला सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या एका घटनेनंतर रोखणे,आवश्यक होते.पण तसे झाले नाही,व पक्षासाठी धडपडणाऱ्या त्या कार्यकर्त्याने दुसऱ्या पक्षाची वाट धरली.दुसरीकडे विरोधी पक्षाने मात्र या निवडणुकीत नियोजनबद्ध आखणी करत धोबीपछाड दिला.त्यांचा प्रचार हा ” डोर टू डोर,” होत होता.तर बहुजन विकास आघाडीचा प्रचार आ.हितेंद्र ठाकूर प्रचारासाठी आले की फक्त चेहरे दाखवण्यापूरता मर्यादित होता.या पराभवामागे आणखीही काही कारणे असू शकतील.” तळागाळातील कार्यकर्त्यांशी तुटलेला संवाद,” हे त्यामध्ये प्रमुख कारण आहे.पूर्वी कार्यकर्ता घराच्या उंबऱ्यावर जाऊन मते मागत असत,ते चित्र आता दुर्मिळ झाले आहे.अशी परिस्थिती का निर्माण झाली ? या मागची काय कारणे आहेत ? हे आ.हितेंद्र ठाकूर यांनी जाणून घ्यायला हवे.आजही तळागाळातील कार्यकर्ते आ.हितेंद्र ठाकूर यांच्यावर जीवापाड प्रेम करतात,पण त्यांचा आक्षेप हा विभागीय पदाधिकारी,नगरसेवक यांच्या वागण्याबाबत आहे.त्यामुळे आ.ठाकूर यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधुन गेल्या तीन वर्षात काय काय घडलं याचा आढावा घेणे,आवश्यक आहे.

