दीपक मोहिते,
महायुती सरकारने पालघर जिल्ह्यावर पुन्हा अन्याय केला,
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये महायुतीने पालघर जिल्ह्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत.पालघर जिल्ह्यात महायुतीचे एकूण पाच आमदार निवडून आले आहेत.त्यापैकी स्नेहा दुबे पंडित,राजन नाईक व हरिश्चंद्र भोये हे तिघे नवखे आहेत.पण राजेंद्र गावित किंवा विलास तरे या दोघांपैकी एकाला संधी मिळेल,अशी पालघरवासियांची अपेक्षा होती,पण हे दोघे शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आले आहेत.त्यांना मंत्रिपद दिल्यास या जिल्ह्यावर निर्माण झालेले आपले वर्चस्व कालांतराने धोक्यात येईल,त्यामुळे त्यांनी पालघर जिल्ह्याला डावलले.याप्रकरणी शिंदे गटाचे एकमात्र चालले नाही.
पालघर जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले असताना,त्यांच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची होती,परंतु राजकीय हाराकिरीमध्ये शिंदे यांना यश मिळू शकले नाही.काही वर्षांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या राजेंद्र गावित यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले होते.पण त्यांच्या कार्यकाळात जिल्हा कात टाकू शकला नाही.त्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत.शिक्षण,आरोग्य,रोजगार,पायाभूत सुविधा,आदिवासी विकास,कुपोषण,बालमृत्यू व गरोदर महिलांचा मृत्यू,इ.प्रश्न व समस्यांचा प्रलंबित विकासकामामध्ये समावेश आहे.तसेच जिल्ह्याला मंत्रिपद दिले जात नसल्यामुळे प्रत्येकवेळी पालकमंत्री देखील बाहेरचा लादला जातो.दादा भुसे हे मूळचे मालेगावचे तर रविंद्र चव्हाण हे शेजारी असलेल्या ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत.या दोघांनी गेली पाच वर्षे पालकमंत्री म्हणून काम पाहिले.त्यामुळे महायुती सरकार यंदा तरी पालघर जिल्ह्याबाबत दूजाभाव करणार नाही,अशा पालघरवासियांच्या अपेक्षा होत्या.

