दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
एकनाथ शिंदे यांची खरोखर दया येते हो ….
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर आता त्यांचा मुक्कामही ” वर्षा,” या सरकारी निवासस्थानाहून ” मुक्तागिरी,” या बंगल्यात हलवण्यात आला आहे.नियमाप्रमाणे त्यांना ते निवासस्थान सोडावे लागणारच होते,काल त्यांचे सामान हलवण्यास सुरुवात झाली.
एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांशी खूप जवळीक साधली होती.ते उठसूठ दिल्लीला जात असत.मोदी व शहा हे दोघे मुंबईत आले की हे दोघेही एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत असत.त्यांच्या या प्रेमाने शिंदेही गहिवरून जात असायचे.पण त्या बिचाऱ्या शिंदेंना कुठे माहीत होते की हे प्रेम,पूतनामावशीचे प्रेम होते ते..
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने निकालानंतर महायतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल ? ते ठरवू असा निर्णय घेतला होता.त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी,आपल्या या दोन्ही गुरूंनी आपला पोपट केल्याचे समजायला हवे होते.जागावाटपात सर्वाधिक जागा पदरात पाडून घेणाऱ्या भाजपने अगदी विचारपूर्वक ही रणनीती आखली होती.जागावाटपात शिंदे व पवार गटाला कमीतकमी जागा द्यायच्या व निकालानंतर ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री,हे त्यांनी अगदी धूर्तपणे ठरवले होते.त्यानुसार त्यांची पावले पडत गेली.आज वृत्तवाहिनीच्या छोट्या पडद्यावरून शिंदे गायब झाले आहेत,कालांतराने अजित पवार यांचीही अशीच अवस्था होणार आहे.एकनाथ शिंदे व अजित पवार,या दोघांनी आता आपली उपयुक्तता संपली आहे,हे लक्षात घ्यायला हवे.आता आपली अवस्था तांदळात असणाऱ्या खड्यासारखी आहे,हे अजित पवार यांनी देखील आता ओळखले आहे.त्यामुळे आपल्या पदरात जे काही पडेल,त्यामध्ये समाधान मानणे,एवढेच या दोघांच्या हातात आहे.उपमुख्यमंत्रीपद हे शोभेचे पद आहे,त्या पदाला संविधानिक दर्जा नाही,ती एक राजकीय सोय आहे.पण या दोघांना त्यावर समाधान मानण्याशिवाय गत्यंतर नाही.अजित पवार यांचा गट शरद पवार यांच्यासोबत असताना त्यांच्या गटाला मंत्रिमंडळात कायम झुकते माप मिळत असे.आज त्यांच्या नशिबी केवळ ०८ मंत्रिपदे आली आहेत.भविष्यात अजून खूप काही घडणार आहे.त्यासाठी आणखी काही काळ आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे.

