दीपक मोहिते,
महानगरपालिकेतील २९ गावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर,
वसई – विरार शहर महानगरपालिकेतील २९ गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणी आलेल्या ३१ हजार ३८९ हरकती व आक्षेपावर येत्या १६ तारखेला सुनावणी सुरू होणार आहे.या सुनावणीनंतर राज्य सरकार या प्रकरणी कोणती भूमिका घेते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसई – विरार शहर महानगरपालिकेतील ग्रामीण भागातील एकूण ५५ गावापैकी वगळण्यात आलेली २९ गावे पुन्हा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकारने १४ फेब्रुवारी २०२४ मध्ये अधिसूचना जारी केली होती.त्याविरोधात सुमारे ३१ हजार ३८९ हरकती नोंदवण्यात आल्या होत्या.राज्य सरकारच्या या अधिसुचने विरोधात दाखल झालेल्या हरकती व घेण्यात आलेल्या आक्षेपावर १६ ते २० डिसें.दरम्यान सहा दिवस सलग सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण गेली १४ वर्षे न्यायालय व सरकार दरबारी प्रलंबित आहे.अनेकदा सुनावणी होऊनही हा प्रश्न मार्गी लागू शकला नाही.राज्य सरकारने इतर गावांसह या गावाचे नियोजन प्राधिकरण म्हणून महानगरपालिकेला अधिकार दिले आहेत.प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही या गावात विविध विकासकामावर महानगरपालिकेने कोट्यवधी रु.खर्च केले.मात्र या सर्व २९ गावांचा महानगरपालिकेत सामील होण्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे.या प्रकरणी आलेल्या हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर राज्य सरकार कसा निर्णय घेते ? याकडे ग्रामीण भागातील जनतेचे लक्ष लागले आहे.सरकारने जर ही गावे महानगरपालिकेत असावीत, असा निर्णय दिल्यास हे प्रकरण पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

