दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महाविकास व इंडिया आघाडीची वाटचाल बिघाडीच्या दिशेने…
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीची वाटचाल आता बिघाडीच्या दिशेने सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तसेच यश पदरात पडेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण आघाडीच्या घटक पक्षात या निवडणुकीत एकवाक्यता व समन्वय याचा अभाव राहिल्यामुळे त्यांचे संख्याबळ साठीच्या आत आले.या पराभवानंतरही त्यांच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.या पराभवाची कारणमीमांसा करणे,आपलं काय चुकलं ? याविषयी हे घटक पक्ष एकत्रितपणे आत्मचिंतन करतील,अशी अपेक्षा होती,पण त्यांनी आपापल्या वेगळ्या चुली मांडण्यात धन्यता मांडली.त्यामुळे ही आघाडी आता किती काळ तग धरेल,हे सांगणे कठीण आहे.
महविकास आघाडीची ही तऱ्हा तर राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या विरोधकांच्या ” इंडिया,”आघाडीमध्येही बिघाडी आता होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.सपाचे अखिलेश यादव,तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी झारखंडचे हेमंत सोरेन व आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल आता एकत्र येऊन नवीन संसार थाटण्याच्या कामाला लागले आहेत.त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरही विरोधकांची ताकद क्षीण होत चालली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाल्यानंतर तिन्ही घटक पक्षाचे मनोधैर्य पार खचले असून उद्धव ठाकरे यांनी तर काँग्रेसची ” संगत नको रे, बाबा,” सांगत ” एकला चलो रे,” अशी भूमिका जाहीर केली आहे.लोकसभा निवडणुकीनंतर सेनेचे संजय राऊत व काँग्रेसचे नाना पटोले या दोघांचे विमान हवेत उडू लागले होते.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेला विजय हा आपल्यामुळेच झाला,असा गैरसमज,या दोघांनी करून घेतला.त्यानंतरच्या काळात हे दोघेही कानात वारं शिरल्यागत राज्यभर उधळत होते.पण महायुतीच्या लाडक्या बहिणींनी त्यांचे हवेत उडणारे विमान थेट हँगरमध्ये नेऊन अडगळीत टाकले.त्यानंतरही त्यांच्या वागण्यात बदल झाला नाही.त्यामुळे आता आघाडीची बिघाडी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. काल संसदेच्या बाहेर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी व गौतम अदानी यांचे मुखवटे लावलेल्या दोघांच्या प्रतीकात्मक मुलाखती घेत आगळे वेगळे आंदोलन केले.या आंदोलनात इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी,तृणमूल काँग्रेस,आम आदमी पार्टीसह अन्य पक्ष सामील झाले नाहीत.त्यानंतर काही तासातच राहुल गांधी यांना इंडिया आघाडीच्या प्रमुख पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

