दीपक मोहिते,
भाग क्र.४
विकासाचा मार्ग,
ग्रामीण भागातील रस्तेबांधणीवर खा.डॉ.हेमंत सवरा यांनी भर द्यावा,
ग्रामीण भागाचा विकास,हा रस्त्याच्या माध्यमातून होत असतो,स्वातंत्र्यानंतरच्या पाऊणशे वर्षात सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने रस्तेबांधणी,या महत्वाच्या विकासकामावर हजारो कोटी रु.खर्च केले.मात्र आजही ग्रामीण भागातील अनेक समस्यांना गावपाड्यावर राहणाऱ्या जनतेला केवळ पायवाटांचाच आधार आहे.ग्रामीण भागातील रस्ते बांधण्याकामी एकाही सरकारने स्वारस्य न दाखवल्यामुळे ग्रामीण भागात उद्योगधंदे वाढीला चालना मिळू शकली नाही.परिणामी भूमिपुत्रांच्या मुलाबाळांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.आज ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगार मिळवण्यासाठी शहरी भागाकडे धाव घेत आहेत.ग्रामीण भागातील खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होतो,ही संकल्पना हल्ली मोडीत निघाली आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहरासोबत ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलला जाईल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण राज्यकर्त्यांनी केवळ शहरी भागाला केंद्रबिंदू ठरवून विकासाची दिशा ठरवली.शहरांचा विकास झाला,पण खेडी मात्र विकासापासून कायम वंचित राहिली.समृद्धी मार्ग,अनेक राष्ट्रीय महामार्ग,द्रुतगती मार्ग,मुंबई – वडोदरा जलदगती मार्ग,असे शहरांना एकमेकांशी जोडणारे अनेक रस्तेप्रकल्प मार्गी लागले,या सर्व कामांवर अब्जावधी रु.खर्ची पडले.पण ग्रामीण भागातील रस्तेबांधणीवर या रकमेच्या १५ % रक्कम देखील खर्च झाले नाहीत.मुंबईच्या सीमेवर असलेल्या पालघर जिल्ह्यात आजही चालायला धड रस्ते नाहीत,एसटी,रुग्णवाहिका व इतर वाहने गावात जाऊ शकत नाहीत.त्यामुळे पाड्यावर एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा गरोदर महिलाना प्रसृतीच्या वेदना सुरू झाल्या की त्यांना गावातील तरुण चादरीची झोळी करून खांद्यावर वाहून तालुक्याच्या ठिकाणी आणतात.देश डिजिटल होण्याची स्वप्न पाहत असताना ग्रामीण भागातील जनता आज अश्मयुगात जगते,हे आपल्या लोकशाही व्यवस्थेला शोभेसे नाही.या सर्व परिस्थितीला सरकारची मानसिकता कारणीभूत आहे.वास्तविक लोकप्रतिनिधींनी ही दाहक समस्या सोडवण्यासाठी आपली जबाबदारी पार पाडायला हवी.पालघर जिल्ह्यातील मोखाडा,विक्रमगड व जव्हार हे तीन तालुके मागासलेले तालुके म्हणून ओळखले जातात.मोखाडा तालुक्यात तर स्थानिक जनता वर्षानुवर्षे अनेक समस्यांना तोंड देत, हालअपेष्टा सहन करत जगत आहे.पण आजवर एकाही लोकप्रतिनिधींच्या हृदयाला पाझर फुटला नाही.गेल्या पाच वर्षात एका आमदाराने तर तालुक्यात दुर्घटना घडली तर मयत व्यक्तीच्या घरी भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करणे व त्या इव्हेंटचे सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात धन्यता मानली.त्यामुळे त्या आमदाराला मतदारांनी या निवडणुकीत साफ झिडकारले.या घटनेतून इतर लोकप्रतिनिधींनी धडा घेतला पाहिजे.पालघर जिल्ह्यात सध्या मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.या कामावर हजारो कोटी रू.खर्च करण्यात येत आहेत.खा.डॉ.हेमंत सवरा यांनी ग्रामीण भागातील रस्तेबांधणी व सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती संदर्भात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालावे,त्यांच्याकडून भरीव आर्थिक निधी मिळवावा,जेणेकरून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पायवाटा नाहीशा होऊन,ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळू शकेल.
क्रमशः

