दीपक मोहिते,
शिंदे गटाची मुस्कटदाबी,
खातेवाटपातही भाजपकडून एकनाथ शिंदे गटाची कोंडी,
मुख्यमंत्रीपदावरून रंगलेले नाट्य आता निवळले असले तरी खातेवाटपावरून पुन्हा नळावरच्या हमरीतुमरीला पुन्हा सुरुवात सुरुवात झाली आहे.आमदारांचा शपथविधी पार पाडण्यासाठी आज तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.या अधिवेशनानंतर सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्तार व खातेवाटपाकडे लागले आहे. महायुतीत मलईदार खात्यांवरून सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी गृहखात्याचा हट्ट धरला आहे.पण आजवरचा अनुभव लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस हे खाते,इतर कोणालाही मिळू देत नाहीत.त्यामुळे शिंदे यांना गृहखातं मिळणे,कठीण आहे.
महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष असून त्यांना सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे भाजपच्या वाट्याला सर्वाधिक खाती जातील,असा अंदाज आहे.गृह विभागासाठी शिंदेचा गट आजही देव पाण्यात टाकून बसले आहेत.तर भाजप याविषयी काहीही ऐकायला तयार नाही.शिंदे यांना त्या तोडीचे एखादे खाते देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
गृहखात्याऐवजी भाजपाकडून एकनाथ शिंदे यांना तीन पर्याय देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.या तीन पर्यायांपैकी एकाची निवड शिंदे सेनेला करावी लागणार आहे.महसूल, जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांचा पर्याय शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती आहे.तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ७ कॅबिनेटमंत्री आणि तीन राज्यमंत्रीपदे देण्याचे ठरले आहे.याबाबत अजित पवार यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित आमदारांची एक बैठक आज पार पडली.
राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे,धर्मरावबाबा आत्राम,आदिती तटकरे, अनिल पाटील,माणिकराव कोकाटे,संजय बनसोडे, दत्तामामा भरणे,इंद्रनील नाईक आणि संग्राम जगताप यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत.
राज्यात एकूण ४३ मंत्रिपदे आहेत आणि महायुतीच्या आमदारांचे संख्याबळ हे २३० इतके आहे.यामध्ये भाजपकडे सर्वाधिक १३२ जागांचे संख्याबळ आहे.तर राष्ट्रवादीपेक्षा आमच्याकडे अधिक संख्याबळ असून आम्हाला पवार गटापेक्षा अधिक मंत्रीपदे मिळाली पाहिजेत,अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. येत्या ११ किंवा १२ डिसें.रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.यात कोणत्या पक्षाचे किती मंत्री शपथ घेणार,याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.शिंदे गटाने जर खूपच ताणून धरल्यास भाजप अजित पवार गटाला हाताशी धरून भाजप शिंदे गटाच्या तोंडाला पाने पुसण्यास मागेपुढे पाहणार नाही.भाजप १३२ व अजित पवार गट ४१ असे एकूण १७३ आमदाराच्या बळावर भाजप सहजगत्या सरकार स्थापन करू शकते.बहुमतासाठी १४५ जागांची आवश्यकता आहे.या सर्व घडामोडी पाहता,भाजपकडून शिंदे गटाची चांगलीच कोंडी करण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

