दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढील पाच वर्षे धोका नाही,
गेल्या आठ दिवसांपासून विविध वृत्तवाहिन्यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेतले,त्यांना दिवसभरात १८ तास प्रसिद्धी दिली.त्यांच्या बातम्या चालवल्या,त्या लक्षात घेता एकनाथ शिदे व अजित पवार हे दोघेही या काळात घनघोर अंधारात गुडूप झाल्याचे दिसून आले.
आज राज्यात ” सबकुछ देवेंद्र,” असे वातावरण पाहायला मिळत आहे.आगामी काळात ” दिल्लीमे नरेंद्र,” और महाराष्ट्रमे देवेंद्र,” ” और ये दोनो है,तो सबकुछ मुमकिन है,” असे घोषवाक्य झाले तर आपल्याला आश्चर्य वाटता कामा नये.
आज दिल्ली दरबारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वजन वाढले आहे.त्यांना विचारल्याशिवाय मोदी व शहा हे दोघे राज्यासंदर्भात कोणताही निर्णय घेत नाहीत.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात मुक्तहस्ते राज्याचा कारभार चालवता येणार आहे.२०१४ ते २०१९ या दरम्यान मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी पक्षांतर्गत स्पर्धा करणाऱ्या एकनाथ खडसे,पंकजा मुंडे व विनोद तावडे या तिघांना जेवणाच्या डाळीतील काडीपत्याला जसे आपण ताटाबाहेर फेकून देतो,तशाप्रकारची वागणूक दिली.पंकजा मुंडे यांनी श्रद्धा व सबुरी राखत पुनरागमन केले,तर विनोद तावडे यांनी राज्यात आपले काही खरं नाही,हे ओळखले व राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे पुनर्वसन करून घेतले.बिहार व अन्य काही राज्यात भाजपची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी मोलाची कामगिरी केली.त्यामुळे ते आजच्या घडीला भाजपच्या राजकारणात टिकून राहिले आहेत.तापट स्वभावाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना मात्र पंकजा मुंडे यांच्यासारखा संयम राखता आला नाही व ते कायम आक्रस्ताळेपणा करत राहिले.अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांचे कट्टर विरोधक व आपले कट्टर समर्थक असलेल्या गिरीश महाजन यांचा ससेमिरा त्यांच्यामागे लावून दिला.महाजन यांनीही गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून खडसे यांना गेली सात वर्षे चांगलेच पिडले.अखेर खडसे यांना शरद पवार यांच्या आश्रयाला जावे लागले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर खडसेंना तेथील वातावरण मानवले नाही आणि ते पुन्हा परतीच्या मार्गाला लागले,त्याना प्रवेशाचा हिरवा सिग्नल देखील मिळाला,पण अचानक तो सिग्नल रेड झाला.तो का लागला व कसा लाल झाला,याविषयी अधिक काही सांगायला नको.आता या पाच वर्षात फडणवीस हे कोणाला धक्क्याला लावतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकनाथ शिंदेचा अडसर त्यांनी पद्धतशीरपणे बाजूला सारला.अजित पवार यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्पर्धा करण्याची कुवत व क्षमता नाही.त्यामुळे पक्ष व सोबत असलेल्या घटक पक्षात आता असा एकही नेता नाही की तो फडणवीस यांना आव्हान देऊ शकेल.त्यामुळे आगामी पाच वर्षे तरी फडणवीस यांना बिलकुल धोका नाही.

