दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वसई तालुक्याच्या वाहतूककोंडीचा प्रश्न ऐरणीवर ; वाहतूक पोलीस केवळ वसुलीच्या मागे,
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला आहे.वाहतूक पोलीस हे ” मलिदा गोळा करण्याच्या संस्कृती,” मध्ये गुंतले आहेत.त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी हे वाहतूक पोलीस गायब होत असतात.वाहतूक पोलिसांची खाबुगिरी व वसई – विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, यामुळे तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत.या प्रकरणी पोलीस आयुक्त व महानगरपालिकेचे आयुक्त या दोघानी हस्तक्षेप करावा,अशी मागणी करण्यात येत आहे.
वसई – विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात वसई,विरार,नालासोपारा,या तीन महानगराच्या पूर्व व पश्चिम भागात सकाळी व संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.स्टेशन परिसर पूर्व व पश्चिम,बोळींज,पूर्वेस उड्डाणपुलाचे टोक ( साईबाबा मंदिर,) साईनाथ नगर,वसई पश्चिमेस माणिकपूर नाका,वसई गाव पारनाका,नालासोपारा पूर्व तुळींज सिग्नल,नालासोपारा पश्चिम सिविक सेंटर चौक,येथे प्रचंड वाहतूककोंडी होत असते.सकाळी ८ ते १० व संध्याकाळी ५.०० ते रात्री ९.०० दरम्यान वाहनाच्या प्रचंड रांगा लागत असतात.अशावेळी वाहतूक विभागाचे पोलीस गायब असतात व असले तरी ते एकतर मोबाईलमध्ये गुंतून पडलेले पाहायला मिळतात किंवा रिक्षावाल्यांच्या घोळक्यात उभे राहून गप्पा मारताना नजरेस पडतात.त्यांच्या मदतीला देण्यात आलेले खाजगी सुरक्षा जवान हे देखील वाहतुकीचे नियोजन करण्याऐवजी सतत मोबाईलवर बोलताना पाहायला मिळत असतात.पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त या दोघांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा व नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.

