दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
वर्गाचा मॉनिटर आता शिपायाच्या भूमिकेत,
देवेंद्र फडणवीस यांना मानलं बुवा,त्यांनी गेली अडीच वर्षे कार्यरत आलेल्या वर्गाच्या मॉनिटरला थेट शिपाई बनवले. बारा दिवस आढेवेढे घेणारे एकनाथ शिंदे यांनी शिपाई म्हणून काल सूत्रे हाती घेतली व भाजपवाल्यांचा जीव भांड्यात पडला.दुसरा आणखी एक शिपाई गुलाबी जाकीट घालून ”
जी साब,जी साब,” बोलण्यासाठी सज्ज झाला आहे.या सर्व घटनाक्रमाने स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे.आजवर एकाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर अशी पाळी आली नव्हती,ती माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आली.असो ” राजकारण व प्रेमात सारं काही क्षम्य,” असते.एका मराठ्याला अशाप्रकारची मानहानी स्विकारावी लागली,याचे मनोज जरांगे पाटलाना देखील वाईट वाटले असावे.ज्या शिंदे यांनी जरांगे पाटलाना आरक्षण देण्यात आले आहे,असे सांगत वेळोवेळी फसवणूक केली,त्या शिंदेंना नियतीने चांगलाच दणका दिला.
काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे यांचा काळवंडलेला चेहरा पाहवत नव्हता.आपण जे काही अडीच वर्षापूर्वी उचापती केल्या,त्यांना त्याचा पश्चाताप झाला असावा,असे वाटते.आपल्या कर्माचे फळ आपल्याला अशाप्रकारे मिळेल,असे त्यांना स्वप्नातही वाटले नसावं,पण मोदी,शहा व फडणवीस या तिगडीने ते घडवून आणले. काल शपथविधी झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी त्यांच्या चरणी नतमस्तक झाले.कदाचित ती एकप्रकारे क्षमायाचना असावी.पण ” अब पछतानेसे क्या फायदा,जब चिडिया चुभ गयी खेत,” या महाराष्ट्राला गद्दारी काही नवीन नाही,शिवशाही,पेशवाई काळातही अशाप्रकारची गद्दारी रयतेने अनुभवली.१९७८ साली देखील ती पाहीली.त्याचीच पुनरावृत्ती अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी केली.२०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पंकजा मुंडे,विनोद तावडे,एकनाथ खडसे,या नेत्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लावला.त्या फडणवीसांना देखील नियतीने २०१९ मध्ये चांगलाच धोबीपछाड दिला.सरकार हातून गेल्यामुळे दिल्लीश्वरानी त्यांना शिंदे यांना दिलेल्या शिक्षेप्रमाणे सजा दिली होती.त्यांना मिळणारे मुख्यमंत्रीपद शिंदे यांना बहाल केले गेले.त्यावेळी त्यांच्या अमित शहा यांनी फडणवीस यांचा अक्षरशः पोपट केला होता.देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांचा गद्दारीशी अगदी निकटचा सबंध आहे.या सर्वांनी ज्या काही उचापती केल्या,त्यांना त्याची सजा मिळाली.अजित पवार यांच्या पत्नीला गेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या मतदारांनी पार झिडकारले,त्यामुळे अजित पवार जवळपास दोन महिने विजनवासात गेले होते.आज तशीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्यावर आली आहे.आता ” तोंड बांधून,बुक्क्यांचा मार सहन,” करण्याशिवाय या दोघांसमोर अन्य पर्याय नाही.

