दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
महायुतीच्या सरकारचा शपथविधी ; घोडं अखेर गंगेत न्हालं..
तब्बल १२ दिवसानंतर आज अखेर तीन इंजिन सरकारचा शपथविधी आझाद मैदानात पार पडला.फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेतली.तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर चेहरा करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.यावेळी उपस्थित असलेल्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच गर्दी केली असली तरी,या समारंभावर नाराजीची गडद छाया पडली होती.माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यासपीठावर गंभीर चेहरा करून बसलेले पाहायला मिळाले.
निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री कोण यावरून राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते.भाजपला मिळालेल्या जागा लक्षात घेता मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच जाणार,हे नक्की होते.पण एकनाथ शिंदे त्यास तयार नव्हते.त्यांनी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची वारंवार भेट घेवून आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.पण त्या दोघांच्या हृदयाला पाझर फुटला नाही.वास्तविक लाडकी बहिण योजना लागू करण्यात शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता.त्याचा फायदा भाजपला व राष्ट्रवादी काँग्रेसला झाला.ही योजना लागू करण्यात अजित पवार यांचे बिलकुल योगदान नव्हते,पण त्यांनी या योजनेची सुरुवात होताच अंगावर गुलाबी जाकीट घातले व ते ” आयत्या बिळावर नागोबा,” झाले.ही योजना लागू होण्यापूर्वी त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत बिकट होती.त्यांना फारशा जागा मिळणार नाही,असा अंदाज व्यक्त होत होता.पण लाडक्या बहिणी त्यांच्या मदतीला धावून आल्या व त्यांना ४१ जागा मिळाल्या.भाजपलाही बहिणीची चांगली मदत झाली व त्यांचे १३३ आमदार निवडून आले.एकनाथ शिंदे गटाला ५१ जागा मिळाल्या,पण त्यांचे घोडं गंगेत न्हाले नाही.आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याचे पाहून नाराज शिंदे यांनी थेट आपले दरे गाव गाठले.दुसरीकडे अजित पवार गटाने आपल्या पदरात जे काही पडेल,त्यात समाधान मानायचे ठरवले व त्यांनी कोणतेही आढेवेढे घेतले नाही.शिंदे नाराज झाले आहेत व ते गावी निघून गेल्याचे कळल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी त्यांना सबुरीने घेण्याचा निरोप पाठवला व शिंदे हे तातडीने मुंबईला रवाना झाले.शिंदे व पवार या दोघांचे हात दगडाखाली असल्यामुळे अधिक ताठरपणा दाखवून चालण्यासारखे नव्हते.मात्र आता शिंदे यांनी गृह,नगरविकास,जलसंपदा, सार्व.बांधकाम व महसूल ही पाच खाती आम्हाला मिळावी,असा हट्ट धरला आहे.पण या महत्वाच्या खात्यापैकी गृह व नगरविकास ही दोन खाती देवेंद्र फडणवीस इतर कोणाला देणार नाहीत. सार्व.बांधकाम व नगरविकास ही खाती शिंदे यांना देण्यास तयार होतील,उर्वरित जलसंपदा,ऊर्जा व ग्रामविकास,ही खाती अजित पवार गटाच्या वाट्याला येतील,अशी शक्यता आहे.त्यामुळे खातेवाटपही फडणवीस सरकारला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.आज झालेल्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी,संरक्षणमंत्री राजनाथसिंह व विविध राज्याचे मुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित होते.

