दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बिच्चारे एकनाथ शिंदे,नियती कोणाला सोडत नाही,हेच खरं…
काल सायंकाळी एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक सुधारली व देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या सरकारविरोधात बंड करताना ते सुरत – गोवामार्गे गुवाहातीला गेले होते.यावेळी तसं न करता हेलिकॉप्टरने थेट आपल्या ” दरे,” गावी निघून गेले.” जैसी करनी,वैसी भरनी,” चा एक एपिसोड येथे संपला.
त्यांना जडलेला आजार हा राजकीय होता,की त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या.यावर सध्या उलटसुलट चर्चा होत आहे.असो,पण आज एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जाणे कितीला पडले,यावर राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.राजकरणात कोण कोणाचा नसतो,हे शिंदे यांनीच अडीच वर्षांपूर्वी दाखवून दिले होते.आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.भाजपने शिंदे यांना ” युज अँड थ्रो,” या उक्तीप्रमाणे झटकून टाकले आहे.एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे काही घडलं,ते आपल्या सोबतही घडू शकतं,अशा भितीमुळे अजित पवार यांनी सध्या ” हाताची घडी व तोंडावर बोट,” अशी शाळकरी विद्यार्थ्याची भूमिका स्विकारली आहे.
या सर्व घडामोडीनंतर भाजप येत्या काही महिन्यात महायुतीमध्ये ” मिशन लोटस,” ही योजना राबवेल,अशी शक्यता आहे.आजच्या घडीला त्यांच्याकडे १३२ जागा आहेत,त्यांना मित्रपक्षाचे १५ आमदार फोडणे,सहजशक्य आहे.तसा ते प्रयत्न देखील ते करतील.पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या दोघांना समान नागरी कायदा,नागरिक सुधारणा कायदा,एक नेशन,एक निवडणूक व त्यानंतर अमेरिकेच्या धर्तीवर अध्यक्षीय पद्धत लागू करायची आहे.राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा तसा अजेंडाच आहे.अशावेळी मोठी राज्ये भाजपला आपल्या ताब्यात हवीत.त्यासाठी त्यांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी असते.महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्यात स्वत:चे सरकार असणे गरजेचे आहे.आज एकनाथ शिंदे यांना आपले दरे गाव गाठावे लागले,भविष्यात अजित पवार हे देखील बारामतीला पोहोचले,तर आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.भाजपने गेल्या दहा वर्षात अनेक घटक पक्ष आपल्या सोबत घेतले व त्यांचे गळे आवळले.येणाऱ्या काळात शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे काही आमदार फुटतील व आपला वेगळा गट बनवून खोके संस्कृती नक्कीच अमलात आणतील.
शिंदे यांच्या बाबतीत एक म्हणावे लागेल,ते म्हणजे ” पाण्यात….की ते हमखास वर येते,” च,याचा अनुभव त्यांनी आपल्या दरे गावात राहून घेतला.चला बघूया,अजित पवार कधी बारामतीच्या वाटेवर मार्गस्थ होतात ते…शेवटी जाता जाता एक सांगतो,नियती कधीही कोणाला सोडत नाही…

