दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मनसे ; आता पुन्हा सावरणे जरा कठीणच…
या निवडणुकीतील निकाल पाहता राज यांची मनसे पुन्हा निवडणुका लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.पालघर व ठाणे जिल्ह्यात मनसेचा झालेला दारुण पराभव लक्षात घेऊन त्यांचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला होता.पण अचानकपणे त्यांना नैतिकतेचा विसर पडला व त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.पण त्यांच्या या कृतीचे पालघर म्हणा की ठाणेवासियाना बिलकुल आश्चर्य वाटले नाही.
सर्वच्या सर्व म्हणजे १२८ उमेदवाराचा पराभव होणे,हा प्रकारच मुळात जिव्हारी लागणारा होता,त्यापैकी ६० ते ७० उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होणे,हे तर त्याहून जिव्हारी लागणारे ठरले.पण या पराभवातून राज व त्याचे फंटर्स काही बोध घेतील,अशी शक्यता नाही.मनसेचे क्रमांक २ व ३ चे नेतेही या लढाईत धारातीर्थी पडल्यामुळे या पक्षाने जो काही थोडाफार जनाधार होता,तोही नाहीसा झाला आहे.यातून ही मंडळी काही बोध घेतील,असे वाटत नाही.त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाला छुपी मदत केली जाते,असा आरोप करण्यात येतो,पण या निवडणुकीत त्यांच्या आमदारांना मिळालेली अल्प मते लक्षात घेता,विरोधकांच्या आरोपात बिलकुल तथ्य नसल्याचे दिसून आले आहे.या पक्षाची स्थापना झाली तेंव्हा तरुणवर्गाचा पक्ष म्हणून अशी ओळख निर्माण झाली होती.२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या पारड्यात तब्बल १३ जागा टाकल्या.त्यानंतर अल्पावधीतच अनेक आमदार राज यांना सोडून गेले.राम कदम,प्रवीण दरेकर यांचा त्यामध्ये समावेश होता.त्यानंतर मात्र सभागृहात राजू पाटील,हा एकच उमेदवार पाहायला मिळाला.अशी परिस्थिती असताना राज मात्र आपल्या प्रत्येक भाषणात ” एकदा मला सत्ता देवून बघा,मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून दाखवतो,” असे आवाहन करत राहिले.पण वारंवार आपली भूमिका बदलणाऱ्या राज यांच्या आवहनाकडे राज्याच्या मतदारांनी दुर्लक्ष करत त्यांच्या पक्षाला भुईसपाट केले.त्यामुळे या निवडणुकीत झालेल्या पडझडीमधून ते सावरतील,असे वाटत नाही.

