दीपक मोहिते,
भयाण वास्तव,
पाणीटंचाई ; वेळीच सावध न झाल्यास जगभरात हाहाकार उडेल….
राज्याच्या यंदा चांगला पाऊस होऊनही अनेक जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.जगातील अनेक देशांनाही या समस्येने चांगलेच घेरले आहे.दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन या शहरात चार दिवस आड पाणी सोडण्यात येत आहे.पण आपण पाणी बचत,पाण्याचा अपव्यय टाळणे,भूगर्भातील पाण्याचा अविरत होणारा पाणीउपशा व पर्यावरणाचे संवर्धन या महत्वाच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही.
जगात सध्या नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली असल्याचे जाणवू लागले आहे.झाडांची कत्तल,डोंगर पोखरणे,वनजमिनी बळकावणे व भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपशा,अशा कारणांमुळे मानवी जीवन आता धोक्यात आले आहे.यामध्ये भूगर्भातील पाण्याचा होणाऱ्या अविरत उपशामूळे आज अनेक देश संकटात सापडले आहेत.अशी स्थिती असूनही माणूस आपल्या वागण्यात बदल करायला तयार नाही.सतत होत असलेल्या उपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असून ती वेळीच रोखण्यात आली नाहीतर येणाऱ्या काळात मानवाला अस्मानी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
आपल्या राज्यात सुमारे १८ ते २० जिल्ह्यात प्रचंड उपसा झाल्यामुळे भूजलाची पातळी खोलवर गेली आहे.अनेक गावांत विहिरी व बोअरिंगची कामे बंद करण्यात आली आहे.प.महाराष्ट्र,मराठवाडा,
विदर्भ व कोकण या चार विभागात प्रचंड उपसा करण्यात येत असतो.या अशा उपशामुळे समुद्राचे खारे पाणी,गोड्या पाण्यात मिसळून या भागातील लोकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण होणार आहे.अमेरिका,ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांनी हा धोका लक्षात घेऊन भूगर्भातील पाण्याच्या उपशावर बंधने आणली आहेत.आपल्या देशात मात्र भूजल व्यवस्थापन ना सरकारला मान्य आहे,ना लोकांना….
पाण्याची उपलब्धता,ही सर्वस्वी पावसावर अवलंबून असते,पावसाचे पाणी अडवणे,भूगर्भात जिरवणे व त्याचा पुन्हा वापर करणे,असे हे चक्र असून ते व्यवस्थित सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण ते विस्कळीत करत असतो.त्यामुळे पृथ्वीवर उपलब्ध पाण्यापैकी केवळ ३ टक्के पाणी गोडे असून ते पिण्यालायक आहे.८० टक्के बर्फ तर उर्वरित १७ टक्के पाणी भूजल अवस्थेत आहे.या १७ टक्के भूजलाचा प्रचंड उपसा होत असल्यामुळे कालांतराने आपल्या राज्याचे वाळवंट होईल,अशी भिती जलतज्ञ व्यक्त करू लागले आहेत.राज्यात नदी,तलाव,नाले,विहिरी व जलसाठे,हे अविरत होणाऱ्या उपशामुळे कोरडे पडू लागले आहेत.सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई व पडणारा दुष्काळ,यावरून आपण बोध घ्यायला हवा,पण तो आपण घेत नाही.भीमा नदीची परिस्थिती अत्यंत भयावह अशी आहे.उजनी धरणातील पाणी पात्रात सोडण्यात येत असल्यामुळे सोलापूरवासियाना निदान पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.उजनीचे पाणी संपले की लोकांचे पाण्याविना हाल होतात.कोकणात पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे भूगर्भात चांगले जलसाठे निर्माण होत असतात.पण हल्ली या भागात रिसॉर्टस व पर्यटन वाढल्यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात उपशा सुरू झाला आहे.असाच उपशा सुरू राहिल्यास भविष्यात कोकणचा कॅलिफोर्निया होण्याऐवजी राजस्थानचे वाळवंट होण्याची शक्यता आहे.मराठवाडा व कोकणातील लोकांना आता एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.येथील भूजलात फ्लोराईडचे प्रमाण वाढत आहे.इतर विभागात देखील नायट्रेटचे प्रमाण वाढीला लागले आहे.विदर्भातील अनेक जिल्ह्याच्या भूजलाचा क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे मानवी जीवनावर परिणाम जाणवू लागले आहेत.सरकारने या गंभीर समस्येची दखल घेऊन भूजल व्यवस्थापन करणे,आवश्यक आहे.केवळ सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून ते होणार नाही तर लोकसहभागाची त्यासाठी गरज आहे.

