दीपक मोहिते,
” वास्तव,”
तीन अपत्ये ; भागवतांचे वक्तव्य,अराजकाला आमंत्रण देणारे,
जगभरातील अनेक देशात सध्या अशांतता निर्माण झाली असून अनेक देश युद्धाच्या खाईत ढकलले गेले आहेत.रशिया-युक्रेन,इस्रायल
-पॅलेस्टाईन,लेबनॉन,इराण,इ.सुरू असलेले युद्ध थांबायचे नाव घेत नाही.सिरिया,लिबिया,श्रीलंका,बांगलादेश,पाकिस्तान,
म्यानमार,इराक व पाकिस्तान या देशात प्रचंड अराजक निर्माण झाले आहे.त्याचा फटका आपण व आपला शेजारी असलेल्या नेपाळ या देशानाही बसण्याची शक्यता आहे.
भारत व नेपाळ,या दोन्ही देशांनी अनेक वर्षापूर्वी लोकशाही व्यवस्था स्विकारली आहे.या दोन्ही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य,धर्मस्वातंत्र्य व मूलभूत अधिकार यास अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे.आपल्या देशाचा कारभार,हा भारतीय संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत केला जातो.मात्र गेल्या दहा वर्षात आपल्या देशाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली जो धुडगूस घालण्यात येत आहे,त्याचे पडसाद आपल्या शेजारी असलेल्या राष्ट्रात उमटू लागले आहेत.बांगला देश,पाकिस्तान,म्यानमार,व अन्य आखाती देशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत.
आजवर ज्या ज्या देशाच्या राजकारणात धर्मांध शक्तीचा प्रवेश झाला,त्या त्या देशात अराजक निर्माण झाले आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ” बटेंगे तो कटेंगे,” ही लोकप्रिय घोषणा उतरवण्याचा प्रयत्न केला.पण शिवाजी महाराज,फुले,शाहू व आंबेडकराच्या या पुरोगामी विचारसरणीच्या राज्यातील जनतेला ती मान्य होणार नाही व त्यांचे सर्वत्र हानिकारक पडसाद उमटतील,असे जाणवल्यानंतर भाजपने योगी यांच्या घोषणेचे रूपांतर ” एक है,तो सेफ है,” असे केले.त्यानंतर आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीयाने किमान तीन अपत्ये जन्माला घातली पाहिजेत,असे आवाहन केले आहे.हिंदू लोकांची संख्या झपाट्याने खाली येत असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला आहे.आजच्या घडीला देशाची लोकसंख्या सुमारे १५२ कोटीच्या घरात पोहोचली आहे.मात्र,गेल्या काही वर्षात हिंदूची लोकसंख्या २.१ % इतकी खाली आल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे रा.स्व.सं.ने आता हे नवीन कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे.
हे एक धोकादायक पाऊल असून देशात गरिबीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.दोन दिवसापूर्वी देशाचा जिडीपी ५.१ इतका खाली आल्याचे धक्कादायक वृत्त प्रसिद्ध झाले आहे.तसेच देशातील बेरोजगारीने उच्चांक गाठला असताना,भागवतांचे हे म्हणणे न्यायाला धरून होणार नाही.मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचे पाहून भागवतांनी आपले हे म्हणणे मांडल्याचे दिसून आले आहे.पण त्यांचे हे धोरण देशाची आर्थिक घडी विस्कळीत करणारी आहेच,पण बेरोजगारी चरमसिमा गाठणारी आहे.

