दीपक मोहिते,
राजकीय घडामोडी,
वसई-विरार शहर मनपा निवडणुका ; भाजपकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात,
लोकसभा,विधानसभा व त्यानंतर आता वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.या निवडणुका सर्वसाधारणपणे फेब्रु.महिन्यात लागतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची एक व विधानसभेच्या सहाही जागा भाजपने जिंकल्या असून या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाचा पार धुव्वा उडाला आहे.त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.राज्याचे मंत्रिमंडळ अस्तिवात आल्यानंतर या निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.महायुतीची निवडणूक यंत्रणा ही वर्षाचे बारा महिने निवडणुकीसाठी सज्ज असते.उमेदवार निवड,घटक पक्षाशी जागावाटपा संदर्भात बोलणी,इ.सोपस्कार तेवढे शिल्लक राहतात. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की या कामाना वेग येत असतो.वसई-विरार शहर महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडीचे गेली दहा वर्षे सलग वर्चस्व होते.२०१० व २०१५ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडीला प्रचंड यश मिळाले.मात्र कोरोनानंतर २०२० साली महानगरपालिकेवर राज्यसरकारने प्रशासकीय राजवट लादली व या महानगरपालिकेचे फेरे उलट्या दिशेने सुरू झाले.या काळात अधिकारी व अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या तिजोरीची अक्षरश: लूट केली.आज ही महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या अत्यंत क्षीण झाली आहे.ठेकेदारानी केलेल्या कामाची बिले न निघणे,कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर न होणे, विकासकामाना निधी न मिळणे,अशा अनियमिततेमुळे आज या महानगरपालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे.तत्कालीन ठाकरे व शिंदे सरकारने केलेले अनेक उपद्व्याप या महानगरपालिकेच्या मुळावर आले आहेत.या महानगरपालिकेत मंत्रालयातून प्रतिनियुक्तीवर येणारे अधिकारी,हे सारे मंत्र्यांच्या मर्जीतील असतात,बहुतेक अधिकाऱ्याच्या नियुक्त्या थेट ठाण्यातून होत असतात.ठाण्यातून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या या अधिकाऱ्यानी महानगरपालिकेची तिजोरी लुटली.या महानगरपालिकेत आपली नियुक्ती व्हावी,यासाठी हे अधिकारी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कसा मलिदा देत होते,तसेच काही अधिकाऱ्यांची पुन्हा पुन्हा नियुक्त्या होणे,याविषयीच्या सुरस कथा आम्ही वसई-विरारकर नागरिक ऐकत असायचो व ते आजही तसंच सुरू आहे.हा एक वेगळा भाग असून त्यावर मी तीन भागाची लेखमाला लिहू शकतो.असो,अशा सर्व परिस्थितीमध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत.सध्या महायुतीकडून बहुजन विकास आघाडीतील नाराज माजी नगरसेवक व नगरसेविकांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.त्यांना कॉल देखील जात आहेत,महायुतीचा मुख्य घटक असलेला भाजप,आता फोडाफोडीचे राजकारणाला फोडणी देण्याच्या तयारीला लागला आहे.त्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना डोळ्यात तेल घालून आपल्या लोकांवर नजर ठेवावी लागणार आहे.

