दीपक मोहिते,
” ग्रामीण भागाचे वास्तव,”
मनरेगा योजनेंतर्गत कामे सुरू करा,वेळेवर वेतन द्या अन्यथा आदिवासी समाजाच्या स्थलांतराला वेग,
पालघर जिल्ह्यात शेतीची कामे सुरू होईस्तोवर ग्रामीण भागातील ग्रामस्थ विविध क्षेत्रात काम करून रोजगार मिळवत असतात.लाकडाच्या मोळ्या,रानभाज्या व फळे विक्री करून आदिवासी समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो.पावसाळ्यानंतर या आदिवासी मजुरांच्या हाताला काम नसते.त्यामुळे तो रोजगाराच्या शोधात शहरी भागात स्थलांतर करतो.पण ज्यांना स्थलांतरण करणे शक्य होत नाही,अशा आदिवासी कुटुंबातील महिला व शाळकरी विद्यार्थी रस्त्याच्या कड्याला बसून रानभाज्या विकत.या मजुरांच्या हाताला काम विकत असतात.ग्रामीण भागातील आदिवासी लोकांना रोजगार मिळवा,असा उद्देश डोळ्यासमोर काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेली रोजगार हमी योजनेचे आता मनरेगा असे करण्यात आले आहे.नामकरण झालेल्या या योजनेमध्ये बदल व सुधारणा होण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराला अक्षरश: उत आला.त्यामुळे आदिवासी मजूर या कामावर यायला सहसा तयार नसतात.वेळेवर भत्ता न मिळणे,इतर क्षेत्रात मिळत असलेले मजुरीचे चांगले दर व कामे मिळण्याची हमी, इ.कारणामुळे पावसाळ्यानंतर आदिवासी मजूर हा शहरी भागात बांधकाम व मासेमारी व्यवसायात स्थिरावतो.तो आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होत असल्यामुळे त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर त्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो.या समाजात निरक्षरतेचे प्रमाण अधिक आहे,यामागे हे महत्वाचे कारण आहे.
ग्रामीण भागातील नागरीक,शेती,मनरेगा व वाड्यावर मजूर म्हणून काम करत दिवसाकाठी २०० ते २५० रु.कमवत असतात. पावसाळा सुरू झाला कि शेतजमिनीची साफसफाई करणे,मशागत करणे,शेतात बी-बियाणे व खते टाकणे,पावसाला सुरुवात झाली कि लावणी,आवणी व भात तयार झाला कि कापणी करणे व झोडणी,अशी कामे करतात.ही सारी अंगमेहनतीची कामे असून काटक असलेला आदिवासी या क्षेत्रात शेतमजूर बऱ्यापैकी रोजगार मिळवतो.मात्र पावसाळा संपला कि या शेतमजुरासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकतो.अशावेळी हा मजूर रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतो.पण ज्यांना आपले गाव सोडणे,शक्य होत नाही,असे अनेक मजूर व त्यांच्या बायका आपल्या परिसरात रस्त्याच्या कड्याला बसून रानभाज्या विकण्याचा व्यवसाय करतात.मोळ्या व रानभाज्या विकणे,यामध्ये ते दिवसाकाठी १५० ते २०० रु.कमवतात.वर्षानुवर्षे आदिवासी समाज अशा पद्धतीची कामे करून आपल्या कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवत असतात.पावसाळा संपला कि मनरेगाची कामे सुरू होतील व आपल्याला काम मिळेल,अशी त्यांची अपेक्षा असते.पण लालफितीच्या कारभारामुळे स्थानिक प्रशासनातील अधिकारी ही कामे वेळेवर सुरू करत नाहीत.आणि सुरू केली तरी त्यांची मजुरी लवकर मिळत नाही.त्यामुळे मनरेगाच्या कामासाठी आता आदिवासी मजूर मिळेनासे झाले आहेत.मनरेगा कामातील बजबजपुरी दूर झाल्यास आदिवासी मजूर शासनाच्या या योजनेवर काम करतील,पण वेळेवर कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे हे आदिवासी मजूर या कामावर येण्यास तयार होत नाहीत.

