दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भविष्यात महाविकास व महायुती टिकण्याची शक्यता फार कमी,
देशातील सारे प्रादेशिक पक्ष आता ” एकला चलो रे,” अशा निर्णयाप्रत आले आहेत.ठाकरे गटाच्या आमदारांनी,” आघाडी व युती,” करून प्रादेशिक पक्षाला फायदा होत नाही,असे मत नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत व्यक्त केले आहे.याविषयी उद्धव ठाकरे यांनीही अनुकूलता दाखवल्याचे समजते.अशा युती व आघाड्या करणे,राष्ट्रीय पक्षांना फायदेशीर ठरते.प्रादेशिक पक्ष मात्र क्षीण होतात,त्यामुळे प्रादेशिक पक्षाचे आमदार याविषयी नाराज असल्याचे दिसून आले आहे.१९९५ पासून भारतीय मतदारांनी एक पक्षीय सरकार या संकल्पनेला तिलांजली देत युती व आघाडी ही संकल्पना स्विकारली.
तत्पूर्वी १९७७ साली जनता दलाचा प्रयोग करण्यात आला,हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाला व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सरकार खाली खेचण्यात आले.पण हा प्रयोग फार काळ टिकला नाही.जनता दलातील घटक पक्षांनी मोरारजी देसाई यांचे सरकार कोसळवले.त्यानंतर भाजपने विश्वनाथ प्रतापसिंग यांचे सरकार पाडले.नरसिंहवराव वगळता इतर पंतप्रधान एच.डी.देवेगौडा,इंद्रकुमार गुजराल,यांची सरकारे धारातीर्थी पडली.महाराष्ट्रात १९९५ साली भाजप व शिवसेनेचे सरकार आले.त्यांनी चार वर्षे व्यवस्थित कारभार केला.१९९९ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्षाने एकत्र येऊन आघाडीचे सरकार बनवले,जे सलग १५ वर्षे सत्तेत टिकून राहिले.२०१४ साली युतीचे सरकार आले व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.युती सत्तेत आल्यापासून भाजप व सेनेमध्ये कुरबुरी सुरू झाल्या.त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याचा इशाराही दिला होता.परंतु उद्धव ठाकरे यांनी टोकाचे पाऊल उचलले नाही,कारण सेना युतीमधून बाहेर पडली तर भाजप,राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार बनवेल,अशी शक्यता होती.पण या दोघांमध्ये रबर बराच ताणला गेला होता.त्यानंतर २०१९ साली जागावाटपावरून या दोघांचे बिनसले,समोरासमोर लढले,पण निवडणुकीनंतर मात्र दोघे एकत्र आले,कारण सरकार बनवण्यासाठी त्यांना एकत्र येण्याची गरज होती.तसे ते एकत्र आले पण मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याच्या प्रश्नावरून त्यांचे बिनसले व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.त्यानंतरचा इतिहास ताजा आहे.पण २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत जे काही घडले त्यावरून महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्ष आता स्वबळावर निवडणुका लढवण्याचा विचार करू लागले आहेत.महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद व महत्वाची खाती यावरून जे रणकंदन माजले आहे,ते पाहता कालांतराने महायुतीला देखील तडे जाण्याची शक्यता आहे.
वेगवेगळी विचारसरणी व ध्येयधोरणे असलेले प्रादेशिक पक्ष,हे फार काळ राष्ट्रीय पक्षाशी साथसंगत करू शकत नाहीत,हे भूतकाळातील अनेक राजकीय घटनांवरून स्पष्ट झाले आहे.त्यामुळे महायुती देखील फार काळ टिकेल,असे वाटत नाही.

