दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच…
लोकसभा,विधानसभा निवडणुकीनंतर लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.कोविड व त्यानंतर ओबीसी आरक्षण प्रश्नी न्यायालयात असलेले खटले मार्गी न लागल्यामुळे या निवडणुका गेली चार वर्षे या सर्व निवडणुका रखडल्या.कोविड संपल्यानंतर महायुती सरकारने या प्रश्नी पावले उचलण्याची गरज होती,पण या निवडणुका लवकर झाल्या तर आपला पराभव होईल,अशा भितीमुळे राज्य सरकारने न्यायालयात प्रयत्न केले नाहीत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यसरकार आता या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी प्रयत्न करेल,अशी शक्यता आहे.साधारणपणे या निवडणुका फेब्रुवारी २५ दरम्यान होतील,असा अंदाज आहे.
मुंबई,ठाणे,औरंगाबाद,पुणे,
नाशिक,कल्याण-डोंबिवली,
वसई-विरार,या महानगरपालिकासह राज्यातील महापालिका आपल्या ताब्यात राहाव्यात,यासाठी महायुती यावेळी जोरदार प्रयत्न करेल.वरील सर्व महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणून ओळखल्या जातात.यामधील मुंबई,ठाणे व पुणे या महानगरपालिका तर सोन्याची अंडी देणाऱ्या आहेत.पुणे वगळता मुंबई व ठाणे महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे गेली अनेक वर्षे वर्चस्व आहे,ते मोडीत काढण्यासाठी भाजप व एकनाथ शिंदे यांचा गट जंग जंग पछाडतील.या दोन्ही महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात आल्यास ठाकरे गटाच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील व उद्धव ठाकरे यांची शिवसेना अधिक क्षीण होईल,असा भाजपच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.त्यामुळे महायुतीचे सरकार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या तयारीला लागले आहे.साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात या निवडणुका लागण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल पाहता महाविकास आघाडी विस्कळीत होण्याच्या तयारीत आहे.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निवडून आलेल्या अनेक आमदारांनी पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची मागणी लावून धरली आहे.मुंबई व ठाणे शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस,या दोघांची ताकद अगदी नगण्य आहे.त्यांना माफक प्रमाणात जागा दिल्या तरी त्यांना जिंकता येणार नाहीत,त्यामुळे त्यांना नाहक जागा देण्यात अर्थ नाही,त्याचा फायदा महायुतीला होईल,म्हणून उद्धव ठाकरे पुढील सर्व निवडणुकीत ” एकला चलो रे,” ची भूमिका घेतील,असा अंदाज आहे.

