दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मनसेचा दारुण पराभव ; राज यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज,
अखेर मनसेने या निवडणुकीच्या निकालावर आपले मौन सोडले आहे.त्यांच्या एका नेत्याने ” न्यायालय त्यांचे,निवडणूक आयोग त्यांचे,मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ? ” असा प्रश्न उपस्थित करत आपल्या पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडले आहे.तसेच महायुतीने या निवडणुकीत आमची फसवणूक केली,असा थेट आरोप केला आहे.त्यांच्या या म्हणण्यात बिलकुल तथ्य नाही,कारण त्यांचे नेते राज ठाकरे हे गेल्या पंधरा वर्षात आपल्या भूमिका वारंवार बदलत राहिले.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुंबई,नाशिक,पुणे,सिंधुदुर्ग व शहरी भागातील महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतल्या,या प्रचार सभात ते महायुतीचे गुणगान गात होते.
तत्पूर्वी ते गुजरात राज्यात जाऊन मोदी यांनी निर्माण केलेले ” व्हायब्रंट गुजरात व्हिजन,” बघून आले होते.त्याचे व्हिजन पाहून ते अक्षरश: भारावून गेले होते.त्यांनी काही दिवस मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले.हे जे काही घडलं त्यामागे ईडीची नोटीस होती.अल्पावधीत या अंकाचा भाग संपला व राज ठाकरे पुन्हा महायुतीचे टीकाकार झाले.महाराष्ट्रातील उद्योगधंदे शेजारच्या गुजरात राज्यात जाणे,राज्यात वाढती बेरोजगारी,महागाई,
परप्रांतीयांचा येणारा लोंढा,रोजगार निर्मिती व महायुतीचा एकंदरीत कारभार ( लाडक्या बहिणी योजनेवर होत असलेली उधळपट्टी,राज्यातील तिजोरीतील खडखडाट व कायदा व सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती ) यावर त्यांनी अनेक जाहीर सभांमधून महायुतीवर चांगलेच तोंडसुख घेतले.त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत ते अचानक महायुतीचे ” स्टार प्रचारक,” झाले व आमच्यामुळे महायुतीचे तीन ते चार खासदार निवडून आले असे बोंबलत फिरू लागले.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा उलटी उडी मारली.त्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली व तब्बल १२८ उमेदवार उभे केले.पण महाराष्ट्राच्या जनतेने पार झिडकारले,त्यांच्या सर्वच्या सर्व जागा मतदारांनी पाडल्या.सुमारे ७० % उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.आता त्यांचे फंटर्स आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीन व महायुतीवर फोडू लागले आहेत.मात्र त्यांचे हे सर्व आरोप हास्यास्पद आहेत.महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या पक्षाविषयी बिलकुल ममत्व वाटत नाही.तुमचे बोलणे व प्रत्यक्ष कृतीमध्ये खोट असल्यामुळे मतदार तुम्हाला थारा देत नाहीत.लोकांचे दैनंदिन जीवनातील किरकोळ व लहानसहान समस्या तुम्ही मार्गी लावू शकता,पण राज्याच्या विकासाबाबत तुमची पाटी कायम कोरीच राहिली.तुमचे व्हिजन व ब्ल्यू प्रिंट,महाराष्ट्राच्या जनतेला कधीच पहायला मिळाले नाही,पहायला मिळाल्या त्या इतर नेत्यांच्या नकला होय.अशा नकला करून तुम्ही निवडणुका कधीच जिंकू शकणार नाहीत.एक ठाम भूमिका घेऊन जेव्हा तुम्ही राजकरणात उतराल तेंव्हाच लोकांना तुमचा पक्ष आपला आहे,असे वाटू लागेल.इतरांवर टीका जरूर करा,पण त्यामध्ये प्रामाणिकपणा असू द्या.लोक आपल्याला का झिडकारतात,याविषयी चिंतन करा,तरच तुमच्या पक्षाला सुगीचे दिवस येऊ शकतात.अन्यथा हे असेच ” ये रे माझ्या मागल्या,” होत राहणार…

