दीपक मोहिते,
” निवडणूक विश्लेषण,”
” अंतिम भाग,”
आ.हितेंद्र ठाकूर फिनिक्स पक्षासारखे पुन्हा भरारी घेतील,
१३३ वसई विधानसभा मतदारसंघ,हा साडेतीन दशके आ.हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.त्या बालेकिल्ल्याला या निवडणुकीत भगदाड पडले.सलग सहावेळा निवडणुका जिंकल्यानंतर यंदा अस काय घडलं की आ.ठाकूर यांचा पराभव झाला ? आ.ठाकूर यांचा पराभव होऊ शकतो,यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही.मात्र अनेक बाबी पडताळल्यानंतर पाच गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या,त्या म्हणजे विरोधकांनी पसरवलेले फेक नरेटिव्ह,बविआचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची निष्क्रियता व फाजील आत्मविश्वास,नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संख्या फळी उभारण्याकडे झालेले दुर्लक्ष व केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेले अपयश,होय..
या मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली.बविआचे हितेंद्र ठाकूर,भाजपच्या स्नेहा दुबे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील,हे तिघे रिंगणात होते.या लढतीत भाजपच्या स्नेहा दुबे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये ३ हजार १५३ मतांनी निसटता विजय मिळवला.यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या स्नेहा दुबे यांना ७७ हजार ५५३ तर ठाकूर यांना ७४ हजार ४०० मते मिळाली.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील यांना ६२ हजार ३२४ मते मिळाली व ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.या लढतीमध्ये विजय पाटील यांनी घेतलेली मते ही दुर्लक्षित करता येणार नाहीत.कारण या मतदारसंघात काँग्रेसची ताकद अगदी नगण्य आहे.त्यांना जी मते मिळाली,ती त्यांनी स्वतःच्या बळावर मिळवली आहेत.मात्र स्नेहा दुबे यांना मिळालेली मते,ही कोणालाही न पटणारी अशी आहेत.गेल्या अनेक वर्षापासून त्या श्रमजिवी संघटनेत सक्रिय आहेत,त्यांचा राजकारणाशी गेल्या महिन्यापर्यंत दुरान्वये संबंध आला नाही.त्या दुबे या लढतीत विजयी होतात,हे एक न उलगडणारे कोडे आहे.
आजवर एकदाही पराभूत न होणारे हितेंद्र ठाकूर नवख्या उमेदवाराकडून हरतात,यावर विश्वासच बसत नाही.पण यंदा तसं घडलं.राजकारण व विकासकामांची पार्श्वभूमी नसलेल्या दुबे यांना वसईकर मतदार हितेंद्र ठाकूर यांना बाजूला सारून विजयाची संधी देतील,यावर शेंबडे पोर देखील विश्वास ठेवणार नाही.त्यामुळे ” कुछ तो गडबड है,” २०१९ साली झालेल्या निवडणुकीत ठाकूर यांनी विजय पाटील यांचा २५ हजार ९५ मतांनी पराभव केला होता.त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत ठाकूर यांना १ लाख ०२ हजार ९५० तर विजय पाटील यांना ७६ हजार ९५५ मते मिळाली होती.तत्पूर्वी २०१४ साली ठाकूर यांनी स्नेहा दुबे यांचे वडील विवेक पंडित यांचा ३१ हजार ८९६ मतांनी पराभव केला होता.या लढतीत ठाकूर ९७ हजार २९१ तर विवेक पंडित यांना ६५ हजार ३९५ मते मिळाली होती.अशी सर्व राजकीय परिस्थिती असताना या निवडणुकीत असे अघटीत घडावे,यामागची कारणे काय आहेत,याचा मागोवा घेणे,आवश्यक आहे.या लढतीच्या निकालाबाबत सर्वत्र साशंकता निर्माण झाली असली तरी,बहुजन विकास आघाडीमध्ये गेल्या काही वर्षात कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ व निर्माण झालेला फाजील आत्मविश्वासही या पराभवाला काही अंशी कारणीभूत आहे.या सर्व घडामोडीनंतर आ.ठाकूर यांना आता भाकरी फिरवावी लागणार आहे,भाकरी करपण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे,त्यामुळे ती करपण्यापूर्वी फिरवण्याची गरज आहे.तसेच पदाधिकारी,नगरसेवक व सर्वसामान्य कार्यकर्ता,या तिघांमध्ये निर्माण झालेली दरी नाहीशी करण्याचे प्रचंड आव्हान पितापुत्रांसमोर आहे.आ.हितेंद्र ठाकूर हे आजवर आलेल्या प्रत्येक संकटाला यशस्वीपणे सामोरे गेले,असा आजवरचा अनुभव आहे.त्यामुळे ते ही लढाई ते नक्की लढतील व २०२९ च्या निवडणुकीत ते राखेतून फिनिक्स पक्षी जसा भरारी घेतो,तशीच भरारी घेतील,यामध्ये तिळमात्र शंका नाही.
समाप्त,

