दीपक मोहिते,
” पर्यटन विशेष,”
पर्यटकांचे विशेष आकर्षण ; निसर्गरम्य ” वांद्री धरण,”
महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून दिले असून पावसाळ्यात अनेक भागातील हिरवाई आणि गर्द वनसंपदेने नटलेले डोंगर – दऱ्यामध्ये मनसोक्त भटकंती करण्याची मजा काही औरच असते. पावसाळ्यामध्ये भटकंती करत असताना रिमझिम पाऊस आणि त्यातल्या त्यात जर घाट रस्त्यांवरून प्रवास करत असाल तर पसरलेली धूक्याची चादर पर्यटकांचे मन मोहुन घेत असते.
महाराष्ट्रामध्ये अनेक धरणे देखील असून पावसाळ्यात या धरणांना भेट देणे,ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच असते.परंतु काही धरणे ही सिंचनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असून महाराष्ट्राची शान आहेत.यापैकी एक पालघर जिल्ह्यातील वांद्री धरण ….
मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण आणि लगतच्या परिसराला पर्यटकांची पहिली पसंती मिळत असते.
मुंबईपासून सत्तर कि.मी.वर अंतरावर आणि मुंबई अहमदाबाद महामार्गालगत गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीत वसली आहे. महामार्गाच्या पूर्वेला पाच कि.मी.अंतरावर गांजे गावच्या हद्दीतील वांद्री नदीवर ऐंशीच्या दशकात आदिवासी उपयोजनेतून मातीचा बंधारा बांधण्यात आला होता.या वांद्री धरणाच्या पाण्याचा परिसरातील शेतीच्या सिंचनासाठी वापर येत असतो.पण धरणाचा जलाशय आणि वांद्री धरण परिसरातील घनदाट जंगलामुळे हा धरण परिसर चित्रीकरणासाठी एक आकर्षणाचे केंद्र झाले आहे.
पावसाळ्यात फेसाळणाऱ्या धबधब्यांवर भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक वांद्री धरण परिसरातील बहिरीफोंडा जायशेत सारख्या दुर्गम भागात येत असतात. जायशेत- बहिरीफोंडा ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूर पाड्याच्या ओहोळ,धबधबा, वांद्री धरणाचा कालवा आणि जायशेत रस्त्यावरील हिरवाईकडे पर्यटक आकर्षित होत असल्याने पावसाळ्यात वांद्री धरण आणि ठाकुरपाडा भागात पर्यटकांची गर्दी असते.
वांद्री धरणाच्या सांडव्याखाली असलेल्या खडकात सांडव्यातून ओव्हरफ्लो होऊन वाहणारे पाणी फेसाळत वाहत असते.फेसाळत वाहणारे पाणी आणि धरण क्षेत्रातील हिरवाई,असे नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करत असते.वांद्री धरणातून वाहणाऱ्या फेसाळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी वसई -विरार महापालिका,ठाणे आणि मुंबई भागातील पर्यटक मोठ्या संख्येने वांद्री धरण क्षेत्रात हजेरी लावत असतात.हा विभाग राज्य शासनाने पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास येथील आदिवासी भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार मिळू शकेल.राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.वांद्री या धरण परिसरात शासनाने जलपर्यटनाची सुविधा केल्यास हे धरण अधिक नावारूपाला येईल. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेणे आवश्यकआहे.
तर यंदा पालघर तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सूर्या प्रकल्पाअंतर्गत असलेले वांद्री धरण तुडुंब भरले आहे, धरण तुडुंब भरल्याने उन्हाळी भातशेतीच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.दुसरीकडे या धरणांमध्ये पर्यटकांचे होणारे वारंवार अपघात लक्षात घेताया धरण परिसरांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे. पर्यटक सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून पाण्यात उतरतात, जागेची अपुरी माहिती व पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने पर्यटक धरणात बुडण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.पोहता येत नसताना देखील मित्रांच्या समवेत मौज म्हणून पाण्यात गेलेल्या अनेकांचा या धरणात बुडून मृत्यू झाले आहेत.खरं तर धरणाचा परिसर पहाता या सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नेमणे हे शक्य नसले तरी किमान सुरक्षा जाळ्या लावणे गरजेचे आहे.पोलीस प्रशासनाने देखील धरण भागात गस्त वाढवायला हवी.
तर एक महत्वाचं म्हणजे पर्यटनस्थळी पर्यटक सोबत मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थ,पाण्याच्या बाटल्या घेऊन जातात.परंतु बऱ्याचवेळा रिकाम्या बाटल्या, खाद्य पदार्थांच्या रिकाम्या पिशव्या,या त्याच ठिकाणी टाकतात.त्यामुळे या निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा जमा होऊन दुर्गंधी पसरत असते.निसर्गाची होणारी ही हानी टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तर पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे होणाऱ्या दुर्घटना पाहता पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पोलिसांनीही पर्यटकांना सुरक्षित व सावधानपणे निसर्गाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.

