दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मुख्यमंत्रीपदाचा तिढा काही सुटेना,माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता,
महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही अद्याप मंत्रिमंडळ स्थापन करणे शक्य झाले नाही.आज विधानसभेची मुदत संपत आहे.पण या मंडळीचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा मात्र सुटता सुटत नाही.दिल्लीहून जोवर खलिता येत नाही,तोवर अनिश्चितता कायम राहणार आहे.महायुतीमधील प्रत्येक घटक पक्षाला निवडणुकीत मिळालेले अभूतपूर्व यश हे आमच्यामुळेच मिळाले आहे,असे वाटू लागल्यामुळे हा तिढा सुटण्यास काही काळ जावा लागणार आहे.
भाजपच्या दिल्लीश्वरांच्या मनात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षापूर्वी केलेली ” मी परत येईन,मी परत येईन,” ही घोषणा प्रत्यक्षात आणण्याची इच्छा आहे.त्यामुळे फडणवीस यांच्या फंटर्सच्या फौजेतील चंद्रशेखर बावनकुळे,गिरीश महाजन व प्रवीण दरेकर हे कामाला लागले आहेत.तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी नरेश म्हस्के,संजय शिरसाठ,शीतल म्हात्रे,हे तिघेही ” माझी लाडकी बहीण योजना,” ही शिंदे यांनीच आणली,त्यामुळे आपण बहुमत मिळवू शकलो,असे कोकलत फिरू लागले आहेत.अजित पवार मात्र सध्या तरी कोणताही दावा करत नाही,कारण त्यांना माहीत आहे की आपण कितीही आदळआपट केली तरी दिल्लीश्वर आपलं काडीमात्र चालू देणार नाहीत.त्यामुळे ते सध्या ” silence is the gold,” अशा मोडवर आहेत.आपल्याला महत्वाची मंत्रिपदे मिळाली तर खूप काही मिळाले,असे समजून ते सध्या या स्पर्धेपासून दूर आहेत.आज भाजप,शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही गट हातात हात घालून राज्याचा गाडा हाकण्याच्या तयारीत असले तरी भविष्यात भाजप या दोन्ही गटातील आमदारांना खोके संस्कृतीचे दर्शन घडवत आपलेसे करेल व मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राखण्याचा प्रयत्न करेल,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.हल्लीच्या काळात आमदारांना खरेदी करणे,हे सहजशक्य आहे,हे तीन वर्षात घडलेल्या घटनांवरून सिद्ध झाले आहे.” खोके दाखवा व आपलेसे करा,” हे आधुनिक काळातील सूत्र भाजप मोठ्या शिताफीने वापरू लागले आहे.त्यामुळे वर्षभरात राज्यात फार मोठी राजकीय उलथापालथ झाल्यास,आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये.

