दीपक मोहिते,
” निवडणूक विश्लेषण,”
भाग क्र.२,
१३२ नालासोपारा विधानसभा,
नालासोपारा विधानसभा ; अखेर धनशक्ती जिंकली…
या मतदारसंघाच्या निवडणुकीचे सारे अंदाज खोटे ठरले.या मतदारसंघात भाजप आपले खाते उघडेल,असे कोणाला वाटले नव्हते,पण जादूची कांडी फिरावी,तशी कांडी फिरली व भाजपचे राजन नाईक अनपेक्षितरीत्या निवडून आले.त्यांना मिळालेली संधी पाहून या विभागात असलेल्या तमाम राजकीय विश्लेषकांचे डोळे पांढरे फटक पडले.अखेर धनशक्ती व इव्हीएम दोघांच्या युतीने ही करामत करून दाखवली.या विजयाला निर्भेळ व प्रामाणिकपणे विजय,असे म्हणता येणार नाही.असो,जे झाले ते झाले.पण ही खंत म्हणा किंवा सल म्हणा,ही नालासोपारावासियाना कायम सलत राहणार आहे.
गेल्या दीड शतकात अनेक पराभव पचवणाऱ्या राजन नाईक यांना लागलेली ही एक प्रकारची लॉटरीच आहे,असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी विजयानंतर कुठेही फारसा जल्लोष केल्याचे पहायला मिळाले नाही.निवडणूक होण्यापूर्वी मतदारसंघात पैसेवाटप करण्याचे जे नाट्य घडले,त्यावरून आपण अनुमान काढू शकतो,की धनशक्ती या मतदारसंघात किती प्रबळ होती,तिच्या प्रभावासमोर जनशक्ती क्षीण झाली व नालासोपारावासियांच्या विश्वासाला तडा गेला.त्यामुळे येणाऱ्या पिढ्या या निकालाकडे कायम संशयाने पाहणार आहे.
या विधानसभा निवडणुका मतदारसंघातील निवडणुकीचा आलेख बारकाईने न्याहाळला असता,असं लक्षात येते की २०१४ व २०१९ मध्ये झालेल्या लढतीमध्ये बहुजन विकास आघाडीने प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवल्याचे दिसून येते.२०१४ साली झालेल्या चौरंगी लढतीमध्ये क्षितिज ठाकूर यांनी याच राजन नाईक यांचा ५४ हजार ४९९ मतांनी पराभव केला होता.त्यावेळी क्षितिज ठाकूर यांना १ लाख १३ हजार ५६६, तर राजन नाईक यांना ५९ हजार ६७,शिवसेनेचे शिरीष चव्हाण यांना ४० हजार ३२१ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोक पेंढारी यांना ०४ हजार ५५५ मते मिळाली होती.या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षावर आपली अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की आली होती.त्यानंतर २०१९ साली सेनेने क्षितिज ठाकूर यांच्यासमोर वादग्रस्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतरवले होते.पण क्षितिज ठाकूर यांच्यासमोर त्यांची डाळ शिजली नाही.या निवडणुकीत क्षितिज ठाकूर यांनी प्रदीप शर्मा यांचा ४३ हजार ७२९ मतांनी पराभव केला.या लढतीत क्षितिज ठाकूर यांना १ लाख ४९ हजार ८६८ तर प्रदीप शर्मा यांना १ लाख ०६ हजार १३९ मते पडली.यंदाच्या निवडणुकीत मात्र चित्र पूर्णपणे पालटून गेले.राजन नाईक यांना १ लाख ६५ हजार ११३ तर क्षितिज ठाकूर यांना १ लाख २८ हजार २३८ मते मिळतात व त्यांचा ३६ हजार ८७५ मतांनी पराभव होतो.हे न उलगडणारे कोडे आहे.मात्र ते आज ना उद्या नक्कीच उलगडेल.आजच्या घडीला नाईक यांचा हा विजय,प्रामाणिकपणे झालेला नाही.धनशक्तीने दाखवलेली ती किमया आहे,अशीच चर्चा सर्वत्र होत आहे.असो,त्यांचा हा विजय बहुजन विकास आघाडीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे.गेल्या पंधरा वर्षात झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या सलग मिळालेल्या विजयामुळे त्यांची यंत्रणा प्रचंड सुस्तावलेल्या स्थितीत आली आहे,आपल्याला पराभूत करण्याची क्षमता विरोधकात नाही,अशा निर्णयाप्रत ते आले व घात झाला.नगरसेवकांमध्ये असलेली धुसफूस,नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली दरी व लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या प्रश्नाकडे सातत्याने झालेले दुर्लक्ष,इ.कारणामुळे त्यांची सर्वसामान्य नागरिकांशी वर्षानुवर्षे जुळलेली नाळ तुटली व या निवडणुकीत ” होत्याचे नव्हते,” झाले.या निकालाने बहुजन विकास आघाडीसमोर पक्षबांधणी व नालासोपारावासियांचा विश्वास प्राप्त करणे,अशी दोन मोठी आव्हाने आहेत.त्या आव्हानाला ते कसे सामोरे जातात,यावर सर्व काही अवलंबून आहे.लिहिण्यास भरपूर काही आहे,पण येथेच थांबतो.पण थांबताना मात्र राजन नाईक यांचा विजय हा निर्भेळ तर नाहीच,पण तो
सनदशीर मार्गानेही झालेला नाही.संशयाचा धूर सर्वत्र पसरला आहे,तो कुठून आला व कसा पसरत आहे,हा एक संशोधनाचा विषय आहे.

