दीपक मोहिते,
निवडणूक विश्लेषण,( १३१ बोईसर विधानसभा )
भाग क्र.१,
पक्षबांधणीकडे झालेले दुर्लक्ष,पराभवाला कारणीभूत,
१३१ बोईसर,१३२ नालासोपारा व १३३ वसई,या तीन मतदारसंघाच्या निवडणुकीचे लागलेले निकाल,हे चक्रावून टाकणारे असेच होते.तसेच ते दस्तुरखुद्द मतदारांनाही विचार करायला लावणारे होते.कारण देशात सध्या ” पैसा फेको,तमाशा देखो,” हा ट्रेंड मोठ्या वेगाने अमलात आणण्यात येत आहे.या मतदारसंघातही याच ” ट्रेंड,” नवनिर्वाचित आ.विलास तरे यांच्या विजयाला हातभार लावणारा ठरला.पण तरे यांना मिळालेले मताधिक्य लक्षात घेता,बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधील मरगळही त्यास कारणीभूत ठरली,असे म्हटल्यास ते वावगं ठरू नये.
१३१ बोईसर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली,प्रमुख तीन उमेदवारासह अन्य काही अपक्ष उमेदवारही रिंगणात होते.पण खरी लढत विद्यमान आ.राजेश पाटील ( बविआ ),माजी आ.विलास तरे,शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व डॉ.विश्वास वळवी शिवसेना ( उबाठा ) या तिघांमध्ये होती.या तिरंगी लढतीमध्ये विलास तरे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेण्यास सुरुवात केली व ती शेवटच्या फेरीपर्यंत टिकवून धरली.प्रत्येक फेरीत त्यांचे मताधिक्य वाढत राहिले.अखेर विलास तरे हे ४४ हजार ४५५ मतांनी विजयी झाले.तरे यांना १ लाख २६ हजार ११७ मते पडली,तर आ.राजेश पाटील यांची गाडी ८१ हजार ६६२ मतावर अडखळली.या पराभवाच्या मागे अनेक कारणे आहेत.त्यापैकी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे गेल्या पंधरा वर्षात पक्षबांधणीकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष होय. पक्षाचे मनुष्यबळ वाढवणे,हे मुख्य लक्ष्य असायला हवे होते,पण ते दुर्दैवाने झाले नाही.समाजातील विविध घटक,जाती – धर्म जोडले गेले पाहिजेत.आज या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला वंजारी,कुणबी,मांगेला,गुजराती,उत्तर भारतीय व इतर समाजाला जोडता आले नाही.आपला भर केवळ वसई तालुक्यातील आपल्या हक्काच्या मतावर कायम भर राहिला.बोईसरच्या पश्चिम भागातील लोकांशी पक्षाची नाळ कधीच जुळू शकली नाही.त्याचा फटका पक्षाला कायम बसत आला.वसई भागातील मतावर बाजी मारू शकतो,या आशेवर बविआचे पदाधिकारी व कार्यकर्ते कायम जगत आले त्यामुळे विरोधी पक्षाने डाव साधला व घात झाला.आ.राजेश पाटील यांच्या अवती भवती असलेले प्रमुख कार्यकर्ते सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा,असे आवाहन करण्याऐवजी ते सतत आपला विजय नक्की असून आपण प्रचंड मताधिक्य घेऊ,अशी स्वप्ने दाखवत राहिली.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारची मरगळ आली, व हीच मरगळ पक्षाच्या मुळावर आली.विकासकामाचे ठेके विशिष्ट लोकांना दिले गेल्यामुळे अनेक कार्यकर्ते खाजगीत नाराजी व्यक्त करत होते.वास्तविक आ.राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीकडे लक्ष देण्याची गरज होती.या सर्व उणीवा विरोधी पक्षाच्या पथ्यावर पडल्या व त्यांनी नियोजनबद्ध आखणी करत यावेळी बहुजन विकास आघाडीला यशस्वीपणे रोखले.त्यांनी केलेल्या उपाययोजना या लोकशाही व्यवस्थेला मारक असल्या तरी तो ट्रेंड त्यांनी देशभरात चालवला आहे.आपल्या येथेही हा धोका आहे,हे आपण लक्षात घ्यायला हवे होते.त्यावर आपण काही करू शकत नाही,हे जरी खरं असले तरी आपण जागृत असायला हवे होते.

