दीपक मोहिते,
निवडणूक विश्लेषण,
भाग क्र.३,
मनसे ; विश्वासार्हता पार रसातळाला गेली,
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या निवडणुकीत अक्षरश: ठिकऱ्या उडाल्या.त्यांच्या या वाताहतीला ते स्वतः जबाबदार आहेत.आपल्या घराशेजारी असलेल्या मतदारसंघात आपण आपल्या मुलाला निवडून आणू शकत नाही,ही खरे दुर्दैव आहे.त्यांच्या पक्षाकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही,इतर पक्षावर खालच्या भाषेत तोंडसुख घेणे,टिंगल टवाळ्या व नकला करणे,इ.गैरप्रकारामुळे मतदारांनी या निवडणुकीत त्यांना अक्षरश: झिडकारले.यातून ते धडा घेतील,अशी शक्यता फार कमी आहे.कारण दुसऱ्याला कमी लेखणे,हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे.तो स्वभाव ते कधीही बदलू शकत नाहीत.कारण त्यांना लोकांकडून मिळणाऱ्या टाळ्यांचे फार मोठे आकर्षण आहे.
असो,या निवडणुकीत त्यांचे एकमेव आ.राजू पाटील यांचाही सुपडा साफ झाला.वारंवार धोरण बदलणारे राज ठाकरे हे भविष्यात बदलतील,असे वाटत नाही.त्यामुळे यापुढे ते निवडणुका लढवतील,असे वाटत नाही.आज त्यांनी आपल्या पक्षात ज्यांना गोळा केले आहे,त्यांचे वागणे कसे आहे ? हे त्यांनी पडताळून पाहण्याची गरज आहे.अशा कार्यकर्त्यांमुळे पक्ष लोकांच्या मनात रुजत नाही,हे राज ठाकरे यांच्या लक्षात यायला हवे.दादागिरी हा राजकारणाचा कधीच गाभा होत नसतो,अशा दादागिरीमुळे काही ठराविक लोकांचे किरकोळ प्रश्न सुटत असतील,पण निवडणुकीच्या रणभूमीवर ते फायदेशीर ठरत नाहीत.तुमच्या प्रत्येक जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय लोटतो,ते केवळ तुम्ही करत असलेल्या नकला बघायला.हा तुमचा मतदार नसतो,तर तुमच्या नकला त्यांना आवडतात,म्हणून ते मोठ्या संख्येने हजेरी लावतात.पण ते लोक मतदानाच्या दिवशी तुमच्या बुथकडे फिरकत देखील नाहीत.वास्तविक राज यांनी आपल्या मुलाला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवायला नको होते.कारण त्यांची झाकली मूठ आता उघडी पडली आहे.जो नेता आपल्या घराशेजारी असलेल्या मतदारसंघात आपल्या मुलाला निवडून आणू शकत नाही,तो नेता आपला तारणहार कसा होऊ शकेल ? ही भावना मनसैनिकांत नक्कीच बळवणार,यात तिळमात्र शंका नाही.कधी मोदींचे गुणगान,तर कधी उद्योगधंदे गुजरात राज्यात चालले,म्हणून ओरड अशा दुटप्पी धोरणामुळे राज यांच्या पक्षाची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे.ती पुन्हा मिळवणे,त्यांना कदापी शक्य होणार नाही,.

