दीपक मोहिते,
” निवडणूक विश्लेषण,”
भाग क्र.२,
संघाचे निवडणुकीत सक्रिय होणे,भाजपच्या पथ्यावर..
या निवडणुकीत मोदी फॅक्टर,नसताना भाजपने एवढे मताधिक्य कसे मिळवले ? याप्रश्नावर नजर टाकली असता,संघ अदृश्यपणे मोलाची कामगिरी करत होता,हे आपल्या लक्षात येईल.त्यांच्या ब्रह्मास्त्रापुढे मराठा व ओबीसी फॅक्टर देखील निष्प्रभ ठरले.गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विभागात मराठा फॅक्टर प्रभावी ठरला होता.तो या निवडणुकीत पूर्णतः निष्प्रभ ठरला.ओबीसी फॅक्टर ही फारसा चलनात आला नाही.या दोन्ही समाजाचे ध्रुवीकरण करण्यात संघ यशस्वी ठरला.या निवडणुकीत संघाने महायुतीच्या नेत्यांना जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे आदेश दिले.त्यांच्या या आदेशाचे महायुतीच्या नेत्यांनी तंतोतंत पालन केले व जरांगे पाटील यांचे खच्चीकरण झाले.पूर्वी अंतरवाली सराटी गावात पत्रकारांची तोबा गर्दी होत असे.निवडणुकीच्या काळात हा गाव ओस पडला,वास्तविक या परिस्थितीला जरांगे पाटील स्वतः जबाबदार आहेत.धरसोड वृत्ती व निवडणुका लढवण्याचा नको तो सोस,या दोन बाबी त्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरल्या.निवडणुका लढवण्याचे जाहीर केल्यानंतर अल्पावधीत माघार घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला,त्यामुळे त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण झाला व भाजपला आपले इप्सित साध्य करता आले व आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न बाजूला पडला व आज जरांगे पाटील हे काहीसे अडगळीत पडले आहेत.
अशाप्रकारची रणनिती अमलात आणत असताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने दुसरीकडे या निवडणुकीत अत्यंत महत्वाची भूमिका गुप्तपणे पार पाडली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ” बटेंगे तो कटेंगे,” हा नारा दिला होता.पण,तो महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीत चालणार नाही,हे चाणाक्ष संघवाल्याच्या लक्षात आले व त्यांनी राज्यभरात अदृश्य पातळीवर कृपणचे ३०० मेळावे आयोजित केले,त्यामुळे शहरी भागात धार्मिक ध्रुवीकरण करण्यात ते यशस्वी होऊ शकले नाही.संघाने शहरे,खेडी,लहान वस्त्या,पाड्यावर ओबीसी संघटनांना मेळावे घ्यायला लावले.गेल्या चार महिन्यापासून संघाने अत्यंत सावध व गुप्तपणे आपली ही योजना राबवली.नालासोपारा शहरात गुजरात राज्यातून आलेल्या संघाच्या ३०० स्वयंसेवकांनी अतिशय पद्धतशीरपणे हा उपक्रम राबवला.संघाचे हे सर्व कार्यकर्ते हॉटेलमध्ये मुक्कामाला राहिले नाहीत,तर ते भाजप कार्यकर्त्यांच्या घरी राहीले.गेल्या लोकसभा निवडणुकीत संघ अलिप्त राहिला.पण या निवडणुकीत आपण निष्क्रिय राहिलो तर महाराष्ट्रासारखे राज्य गमावू व त्याचे पडसाद इतर राज्यात उमटतील,हे लक्षात घेऊन संघ मैदानात उतरला व त्यांची मेहनत फळाला आली.” बटेंगे तो कटेंगे,” या योगीच्या नाऱ्याचे याच संघवाल्यानी ” एक है,तो सेफ है,” यामध्ये रूपांतर केले व त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

